आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्याचा थरार शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पाहायला मिळाला. या सामन्यात सीएसकेने बाजी मारत सामना २७ धावांनी खिशात घातला. तसेच चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले. या विजयाचा शिल्पकार सीएसकेचा धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसिस ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
याव्यतिरिक्त या आयपीएल हंगामात खेळाडूंच्या फलंदाजीतून नुसता धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळाले. यामध्ये कुणी सर्वाधिक धावा केल्या, कुणी सर्वाधिक चौकार ठोकले, तर कुणी सर्वाधिक षटकार. चौकारांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याचा मान ऑरेंज कॅप विजेता सीएसकेचा धुरंधर ऋतुराज गायकवाडलाच मिळाला. त्याने ६० पेक्षाही अधिक चौकार ठोकले.
या लेखातून आपण अशा ५ खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक चौकार ठोकले आहेत. चला तर मग सुरुवात करूया… (5 Players Who Hit Most Fours In IPL 2021)
आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे ५ फलंदाज-
१. ऋतुराज गायकवाड- ६४ चौकार (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई सुपर किंग्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी कॅप) पटकावली. त्याने १६ सामने खेळताना ४३.३५ च्या सरासरीने ६३५ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने तब्बल ६४ चौकारांचा पाऊस पाडला.
२. शिखर धवन- ६३ चौकार (दिल्ली कॅपिटल्स)
दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक चौकार मारणारा दुसराच फलंदाज ठरला. या हंगामात त्याने १६ सामन्यात ३९.१३ च्या सरासरीने ५८७ धावा केल्या. या धावा करताना त्याने ऋतुराजपेक्षा फक्त एक कमी म्हणजेच ६३ चौकार ठोकले.
३. फाफ डू प्लेसिस- ६० चौकार (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिसने या हंगामात जबरदस्त फटकेबाजी केली. यासह तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने कठीण परिस्थितीत संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाची कामगिरी केली. या हंगामात त्याने १६ सामने खेळताना त्याने ४५.२१ च्या सरासरीने ६३३ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ६० चौकारांची आतषबाजी केली.
४. पृथ्वी शॉ- ५६ चौकार (दिल्ली कॅपिटल्स)
दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा विस्फोटक सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉनेही आपल्या बॅटमधून चौकारांचा पाऊस पाडला. त्याने १५ सामने खेळताना ३१.९३ च्या सरासरीने ४७९ धावा केल्या. या धावा करताना त्याने ५६ चौकार ठोकले.
५. शुबमन गिल- ५० चौकार (कोलकाता नाईट रायडर्स)
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा जबरदस्त फलंदाज शुबमन गिलनेही आपल्या फलंदाजीने सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांमधील स्थान मिळवले. त्याने या हंगामात १७ सामने खेळताना २८.११ च्या सरासरीने ४७८ धावा केल्या. या धावा करताना त्याला ५० चौकारांची साथ मिळाली.
संबंधित बातम्या-
-आयपीएल २०२१ विजेत्या सीएसकेसाठी रनमशीन ठरलेत ‘हे’ ५ धुरंधर, पुणेकर ऋतुराजने तर कहरचं केलाय
-IPL 2021: फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह फाफ बनला सामनावीर, ‘हे’ आहेत याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
-भारीच ना! आयपीएल २०२१ला मिळाला नवा ‘पर्पल कॅप’ विजेता; ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज






