साल २०१८ पासून आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला सुरुवात केली होती. ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली असून जून महिन्यात १८ ते २२ तारखे दरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.
गेल्या दोन वर्षांत या स्पर्धेत फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी देखील अनेक विक्रम रचले. याच निमित्ताने आजच्या लेखात आपण या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंचा आढावा घेऊया.
१) बेन स्टोक्स – इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने या स्पर्धेत एकूण १७ सामने खेळले आहेत. इंग्लंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा जवळपास प्रत्येक सामना खेळला. यात ३१ षटकार मारत त्याने या यादीत अव्वल स्थान गाठले आहे.
२) रोहित शर्मा – भारतीय संघाचा सलामीवीर रोहित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये भारताकडून सगळे सामने खेळला नाही. त्याला या स्पर्धेत केवळ ११ सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र यात त्याने २७ षटकार मारत या यादीत दुसरे स्थान पटकावले. आता अंतिम फेरीत त्याला बेन स्टोक्सला मागे टाकण्याची देखील संधी आहे.
३) मयंक अगरवाल – भारतीय संघाचा अजून एक सलामीवीर मयंक अगरवाल हा यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. खरंतर मयंक कसोटी क्रिकेटमध्ये फारसे मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जात नाही. मात्र त्याने अचूक वेळी गोलंदाजांवर हल्ला चढवत षटकार वसूल केले आहेत. त्यामुळेच या यादीत १२ सामन्यातील १८ षटकारांसह तिसर्या स्थानी विराजमान आहे.
४) रिषभ पंत – भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दमदार कामगिरी नंतर चर्चेत आला. मुळातच आक्रमक फलंदाजी करण्याचा स्थायीभाव असलेल्या पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्येही तोच सिलसिला कायम राखला. त्याने ११ सामन्यात १६ षटकार मारत या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.
५) जोस बटलर – इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये इंग्लंडकडून १८ सामने खेळले आहेत. ज्यात १४ षटकार त्याने मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! मिस्टर क्रिकेट हसीची कोरोनावर यशस्वी मात; सुखरुप पोहचला आपल्या घरी
केकेआरच्या ‘या’ खेळाडूचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, मायदेशी झाला रवाना