आयपीएल २०२१ मधील दुसरा टप्पा युएईत पार पडला. यामधील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना सीएसकेने २७ धावांनी आपल्या खिशात घातला. यासह सीएसकेने आयपीएलची चौथी ट्रॉफीही आपल्या नावावर केली. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने चमकदार कामगिरी करत आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला.
ऋतुराजव्यतिरिक्त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सीएसकेच्या फाफ डू प्लेसिसचाही समावेश आहे. या लेखातून आपण आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया… (5 Players Who Score Most Runs In 2021)
#आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
१. ऋतुराज गायकवाड-
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी कॅप) पटकावली. त्याने १६ सामने खेळताना ४३.३५ च्या सरासरीने ६३५ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ४ अर्धशतकेही ठोकली आहेत.
२. फाफ डू प्लेसिस-
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिसने या हंगामात जबरदस्त फटकेबाजी केली. यासह तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने कठीण परिस्थितीत संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाची कामगिरी केली. या हंगामात त्याने १६ सामने खेळताना त्याने ४५.२१ च्या सरासरीने ६३३ धावा कुटल्या.
३. केएल राहुल-
किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज केएल राहुलने यंदाचा हंगाम त्याच्या फलंदाजीने गाजवला. त्याने पंजाबकडून जवळपास सर्व सामन्यात मोठ्या धावा केल्या. त्याने या हंगामात ६२.६० च्या सरासरीने १३ सामन्यात ६२६ धावा केल्या. यात त्याच्या शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
४. शिखर धवन-
दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला. या हंगामात त्याने १६ सामन्यात ३९.१३ च्या सरासरीने ५८७ धावा केल्या. या धावा करताना त्याने ४ अर्धशतके केली.
५. ग्लेन मॅक्सवेल-
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने या हंगामात चांगली कामगिरी केली. या हंगामात त्याने तब्बल ६ अर्धशतके कुटली. यासह त्याने १५ सामने खेळताना ४२.७५ च्या सरासरीने ५१३ धावा केल्या. मॅक्सवेलने बेंगलोर संघासाठी या हंगामात फायदेशीर ठरला. मागील हंगामात त्याने एकही षटकार ठोकला नव्हता. मात्र, या हंगामात त्याने तब्बल २१ षटकारांचा पाऊस पाडला.
हेही वाचा-
-भारीच ना! आयपीएल २०२१ला मिळाला नवा ‘पर्पल कॅप’ विजेता; ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज
-राडाच ना! आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे विस्फोटक फलंदाज; ऋतुराज ठरला चेन्नईचा तिसरा खेळाडू
-आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा