2018 हे वर्षाचा आज (31 डिसेंबर) शेवटचा दिवस. या 2018 वर्षात सर्वच संघाच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. 2018 मधील सर्वच संघाचे सामने संपले असल्याने आपल्याला यावर्षी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजही मिळाले.
यात पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा आहे. तर भारताचे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे देखील पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये आहेत. विशेष म्हणजे यावर्षीचे पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये 4 वेगवान गोलंदाज आहेत. तर 1 फिरकी गोलंजाज आहे.
हे आहेत 2018 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज –
1. कागिसो रबाडा – दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यावर्षीचा कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षी 10 कसोटी सामन्यात 52 विकेट् घेतल्या आहेत. यातील त्याने 2 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे तर 1 वेळा एका सामन्यात 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पोर्ट एलिझाबेथ कसोटीत पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 6 अशा 11 विकेट घेत त्याची यावर्षीची सर्वोत्तम कामगिरी केली.
2. दिलरुवान परेरा – श्रीलंकेसाठी जरी हे वर्ष खास ठरले नसले तरी दिवरुवान परेरासाठी हे वर्ष खास ठरले आहे. त्याने यावर्षी कसोटीत 11 सामन्यात 29.32 च्या सरासरीने 50 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो यावर्षीचा 50 विकेट्स घेणारा दुसराच गोलंदाज आहे.
त्याच्यासाठी यावर्षातील जूलैमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गाले येथे झालेला कसोटी सामना विशेष ठरला होता. या सामन्यात त्याने 10 विकेट्स घेत यावर्षातील त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने यावर्षी 3 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
3. नॅथन लायन –ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. तो यावर्षीच्या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये एकमेव फिरकी गोलंदाज आहे.
त्याने यावर्षी उत्तम कामगिरी करताना 10 सामन्यात 34. 02 च्या सरासरीने 49 विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने 2 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
तसेच त्याने पाकिस्तान विरुद्ध अबुधाबी तर भारताविरुद्ध अॅडलेड आणि पर्थ कसोटीत प्रत्येकी 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पर्थ कसोटीत भारताविरुद्ध 106 धावांत 8 विकेट्स घेण्याची केलेली कामगिरी त्याची यावर्षीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
4. जसप्रीत बुमराह – भारताचा यावर्षीचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने यावर्षी कसोटीत पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या वर्षीच अशी उत्कृष्ट कामगिरी त्याने केली आहे. त्याने यावर्षी 9 सामन्यात खेळताना 21.02 च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे या सर्व विकेट्स त्याने परदेशात घेतल्या आहेत. तसेच तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात एका डावात 5 विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाजही ठरला आहे.
त्याने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 86 धावात 9 विकेट्स घेत त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
5. मोहम्मद शमी – बुमराहबरोबरच यावर्षी भारताकडून मोहम्मद शमीनेही चांगली कामगिरी केली आहे. त्याने यावर्षी 12 कसोटी सामन्यात 26.97 च्या सरासरीने 47 विकेट्स घेतल्या आहेत.तसेच त्याने यावर्षी पहिल्यांदाच एका वर्षात 40 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे.
2018 हे वर्ष त्याच्यासाठी कौटुंबिक वादामुळे संघर्षपूर्ण होते. पण त्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झालेला नाही. त्याने यावर्षी एका डावात 5 विकेट् घेण्याची कामगिरी 2 वेळा केली आहे. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 74 धावांत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याची यावर्षीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–२०१८ वर्षांत कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
–बुमराहला २०१९मध्ये सर्वच मालिकेत मिळणार नाही संधी, जाणून घ्या कारण
–किंग कोहलीकडून यंग चाहत्याला क्रिकेट पॅड भेट, पहा व्हीडिओ