एमआरएफचे स्टिकर असणारी बॅट म्हटलं की पहिल्यांदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समोर येतो. सचिनने ९० च्या दशकापासून एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट वापरली. काही वर्षांसाठी केवळ सचिन एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट वापरत होता. पण नंतर एमआरएफनेही पुढे विस्तार केला आणि अनेक क्रिकेटपटूंशी बॅट स्पॉन्सरशीपसाठी करार केला.
सध्याच्या अनेक युवा खेळाडूंशीही एमआरएफने बॅट स्पॉन्सरशीपचा करार केला आहे. एमआरएफचे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी असे आहे. एमआरएफ ही टायर बनवणारी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे.
या कंपनीच्या स्टिकर्सवर ‘जिनियस’ म्हणजेच अलौकिक असे लिहिलेले आहे. त्यांच्या स्टिकरमधील हा शब्द दोन गोष्टींचा अर्थ दर्शवितो – एक म्हणजे फलंदाज जो एमआरएफ बॅट वापरत आहे तो अलौकिक आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे, एमआरएफ त्यांच्या कामात कुशल आहेत.
या लेखात एमआरएफचे स्टिकर बॅटला लावून खेळलेल्या ५ दिग्गज खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. (5 best players who played with a MRF sponsored bat)
१. सचिन तेंडुलकर – ९० च्या दशकापासून एमआरएफ आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील कराराला सुरुवात झाली. एमआरएफला जी प्रसिद्धी नंतर मिळाली त्यात सचिन तेंडुलकरचा मोठा वाटा आहे. सचिननेही अनेक मोठी यशाची शिखर एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट वापरताना पार केली.
१९९६ च्या विश्वचषकानंतर एमआरएफने सचिनबरोबर करार केला. त्यानंतर एमआरएफच्या बॅट आणि सचिन तेंडुलकर असेच समिकरण झाले होते.
सचिनने त्याच्या कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. तसेच ४६३ वनडे सामने खेळले आहेत. तो वनडे आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने कसोटीत १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच वनडेत १८४२६ धावा केल्या आहेेत.
२. ब्रायन लारा – एमआरएफशी वेस्ट इंडिजचा आक्रमक दिग्गज फलंदाज ब्रायन लारा बराच उशीरा जोडला गेला. पण त्याच्यासाठी एमआरएफचा करार खास ठरला. कारण २००४ ला लाराने इंग्लंड विरुद्ध कसोटीत ४०० धावा करण्याचा विश्वविक्रम केला, तेव्हा त्याच्या बॅटला एमआरएफचे स्टिकर लावलेले होते.
त्यामुळे सचिन नंतर एमआरएफची बॅट वापरणारा तो क्रिकेटमध्ये एक दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला गेला. लाराने त्याच्या कारकिर्दीत १३१ कसोटी सामने खेळताना ११९५३ धावा केल्या. तसेच त्याने २९९ वनडे सामने खेळले त्यात त्यानेे १०४०५ धावा केल्या आहेत.
३. स्टिव्ह वॉ –
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार स्टिव्ह वॉनेही एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट वापरली. वॉने त्याच्या कारकिर्दीत अनेकवर्षे गन आणि मुरची बॅट वापरली. पण त्यांच्याबरोबरील भागीदारीनंतर त्याने एमआरएफबरोबर करार केला.
त्यावेळी वॉ कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार होता. त्यामुळे त्याच्या एमआरएफच्या स्टिकरवर ‘Conqueror’ असे लिहिलेले होते. Conqueror म्हणजेच ‘विजेता’. त्या काळात एमआरएफने त्यांच्या स्टिकर्सवर फलंदाजाच्या विशिष्ट गुणधर्माबद्दल एक शब्द लिहिण्यास सुरुवात केली होती. वॉने त्याच्या कारकिर्दीत १६८ कसोटी सामने खेळताना १०९२७ धावा केल्या. तसेच ३२५ वनडेत ७५६९ धावा केल्या आहेत.
४. विराट कोहली – सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होणारा विराट कोहलीही एमआरएफची बॅट वापरतो. सचिन नंतर एमआरएफची बॅट वापरणारा विराट भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला गेला.
विराटने २०१७ मध्ये एमआरएफबरोबर त्याच्या कराराचे नुतनीकरण केले होते. यावेळी त्याने ८ वर्षांसाठी १०० कोटींचा करार केला आहे. त्याआधी त्याने ३ वर्षांसाठी ८ कोटीचा करार केलेला होता.
विराटने आत्तापर्यंत ८६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७२४० धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने २४८ सामने आणि टी२०मध्ये ८१ सामने खेळले आहेत. त्याने वनडेत ११८६७ धावा केल्या आहेत, तर टी२०मध्ये २७९४ धावा केल्या आहेत.
५. एबी डिविलियर्स – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सनेही काही सामन्यांसाठी एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट वापरली आहे. पण तो एमआरएफसाठी खूप कमी कालावधीसाठी जोडला गेला. त्याने केवळ एका मोसमासाठी एमआरएफबरोबर करार केला.
पण डिविलियर्समधील गुणवत्ता पहाता त्याचीही एमआरएफची बॅट वापरलेल्या दिग्गज फलंदाजांमध्ये गणना होते. डिविलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी त्याने ११४ कसोटी सामन्यात ८७६५ धावा केल्या होत्या. तसेच २२८ वनडेत त्याने ९५७७ धावा तर टी२०मध्ये ७८ सामन्यात १६७२ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
शेवटच्या १० ओव्हरमध्ये धु- धु धुणारे जगातील ५ क्रिकेटपटू
अखेर क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा असलेला हा दौरा झाला रद्द
आणि फ्लिटाॅफ युवराजला म्हणाला, बाहेर भेट; मी तुझा गळाच कापतो