बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावात अनेक विदेशी खेळाडू चांगलेच मालामाल झाले. तर, देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंवरही मोठ्या-मोठ्या बोल्या लागल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही या लिलावात काही अनपेक्षित गोष्टी घडल्या. ज्या खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागू शकत होती, अशा काही खेळाडूंवर बोली लावण्यास कोणीही स्वारस्य दाखवले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे नाव असणाऱ्या त्या पाच खेळाडूंविषयी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांना या लिलावात कोणीही खरेदी केले नाही.
१) जेसन रॉय
इंग्लंडच्या टी२० संघाचा सलामीवीर जेसन रॉय या लिलावात सहभागी झाला होता. रॉयची आधारभूत किंमत २ कोटी रुपये होती. मात्र, रॉयवर या लिलावात कोणत्याही संघाने बोली लावली नाही. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या संघाचा नियमित सदस्य असलेला रॉय नुकत्याच संपलेल्या बिग बॅश लीगमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. रॉयने यापूर्वी गुजरात लायन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
२) ऍरॉन फिंच
ऑस्ट्रेलियाच्या वनडे व टी२० संघाचा कर्णधार असलेला ऍरॉन फिंच हा देखील या लिलावात विकला गेला नाही. त्याची आधारभूत किंमत २ कोटी रुपयांची होती. फिंचने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक ८ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला होता. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी न करता आल्याने आरसीबी संघ व्यवस्थापनाने करारमुक्त केले होते.
३) हनुमा विहारी
भारताच्या कसोटी संघाचा सदस्य हनुमा विहारी याला देखील २०२१ आयपीएल लिलावात खरेदीदार मिळाला नाही. भारताचा दुसरा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याला बोली लागल्यानंतर, दुसऱ्या फेरीमध्ये विहारीवर बोली लागेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र, तो दुसऱ्या फेरीतही विकला गेला नाही. विहारीने यापूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल संघांसाठी आपली कौशल्ये दाखवली होती.
४) ऍलेक्स केरी
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऍलेक्स केरी याच्यावर देखील या लिलावात कोणीही बोली लावली नाही. त्याने आपली आधारभूत किंमत २ कोटी रुपये इतकी ठेवली होती. केरीने मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. बिग बॅशच्या दहाव्या हंगामात चांगली कामगिरी केल्याने, त्याच्यावर मोठी बोली लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, कोणत्याही संघाने त्याला विकत न घेतल्याने त्याचा अपेक्षाभंग झाला.
५) मोहित शर्मा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा अनपेक्षितरीत्या या लिलावात विकला गेला नाही. भारतासाठी २०१५ वनडे विश्वचषक व २०१६ टी२० विश्वचषक खेळलेला मोहित शर्मा याच लिलावात विकला जाण्याची शक्यता होती. मात्र, कोणत्याही संघाने त्यावर बोली लावण्यात स्वारस्य दाखवले नाही. मोहितने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. सततच्या खराब कामगिरीमुळे व दुखापतीमुळे त्याची आयपीएल कारकीर्द धोक्यात आल्याचे दिसते.
महत्त्वाच्या बातम्या-
संपूर्ण यादी : आयपीएल २०२१ लिलावानंतर ‘असे’ आहेत सर्व ८ संघांचे खेळाडू
मॅक्सवेलला १४.२५ कोटींची बोली लागल्यानंतर वीरेंद्र सेहवागने शेअर केला ‘हा’ व्हिडिओ
आयपीएल लिलावात १४ करोड रुपयांची कमाई करणारा झाय रिचर्डसन आहे तरी कोण? घ्या जाणून