क्रिकेटमध्ये कोणत्याही संघात गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक आणि अष्टपैलु खेळाडू यांचा समावेश असतो. संघातील या प्रत्येक खेळाडूची भुमिका एकप्रकारे ठरलेली असते. त्यामुळे प्रमुख फलंदाज आणि गोलंदाज आपल्या भुमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतात. फलंदाज हे गोलंदाजीपेक्षा आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करतात. तसेच गोलंदाजही आपल्या गोलंदाजीवरच लक्ष केंद्रीत करत असतात.
“क्रिकेटमध्ये एक मात्र गोष्ट नेहमीच दिसून आली आहे. ती म्हणजे, कित्येक गोलंदाज हे चेंडू फेकण्यासोबतच बॅटने चेंडू टोलावण्याचाही आनंद घेत असतात. भलेही त्यांनी फलंदाजीचा विशेष सराव केलेला नसेल. तरिही मैदानावर मात्र त्यांनी अनेकदा संघाला आपल्या फलंदाजीने तारले आहे.”
क्रिकेटच्या इतिहासात असे कित्येक सामने झाले आहेत, ज्यात तळातील फलंदाजांनी म्हणजे गोलंदाजांनीच फलंदाजी करत त्यांच्या संघाला विजयी केले आहे.
साधारणतः तळातील फलंदाज म्हणजे, क्रमांक 7 च्या पुढे आलेले खेळाडू हे गोलंदाज असतात. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ, या खेळाडूंना आपण सहज बाद करु शकतो, अशा भ्रमात असतो. परंतु, काही गोलंदाज आपली विकेट सहजासहजी गमावत नाहीत. कित्येकदा अशा खेळाडूंनीच गमावलेला सामना पुन्हा खेचून आणला आहे.
या लेखात आपण असेच पाच दिग्गज गोलंदाज आणि त्यांनी काही सामन्यांमध्ये केलेले, असे काही विक्रम पाहणार आहोत; ज्यात संघातील या प्रमुख गोलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. तसेच आपल्या बॅटमधून धावांचा रतीब घालत संघाला विजयी केले. त्यांच्या या खास खेळींना क्रिकेट इतिहासात मानाचे स्थान आहेत.
क्रिकेटच्या इतिहासातील 5 विक्रम जे गोलंदाजांनी फलंदाज म्हणून केले…
क्रमांक – 1
- खेळाडू : जेसन गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया)
जेसन गिलेस्पीने नेहमीच आपल्या गोलंदाजीने संघाला तारले होते. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात त्याचे नाव तेव्हा नोंदले गेले, जेव्हा या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने फलंदाजी करताना एक अनोखा विक्रम केला.
जेसन गिलेस्पी याने 2006 साली चितगाव येथे बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विक्रमी खेळी केली होती. त्या सामन्यात फलंदाजीला उतरल्यानंतर जेसन गिलेस्पीने नाबाद 201 धावा केल्या होत्या.
“माइकल हसीसोबत जेसनने तब्बल 320 धावांची भागिदारी केली होती. तसेच या खेळीसह जेसन गिलेस्पीने कोणत्याही ‘नाइटवॉचमन’कडून बनवण्यात आलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर केला होता.”
जेसन गिलेस्पीने त्या सामन्यात तब्ब्ल 574 मिनिटे मैदानावर तळ ठोकला होता. यात त्याने माइकल हसीसोबत केलेल्या 320 धावांच्या भागिदारीमुळे ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 581 वर पोहचली होती. जेसनने 425 चेंडूंचा सामना करत 201 धावा केल्या होत्या.
विशेष बाब म्हणजे, “जेसन गिलेस्पीने ही कामगिरी त्याच्या जन्मदिनी म्हणजे 19 एप्रिल रोजी केली होती.”
क्रमांक – 2
- खेळाडू : अजित आगरकर (भारत)
भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर हा जसा एक दिग्गज गोलंदाज म्हणून प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तसाच तो त्याने केलेल्या काही खास विक्रमांमुळेही प्रेक्षकांना आठवतो. भारताचा एक प्रमुख गोलंदाज असलेल्या या खेळाडूने संघाकडून फलंदाजी करत असताना काही ऐतिहासिक खेळी साकारल्या आहेत.
यातील पहिली खेळी म्हणजे, अजित आगरकरने इंग्लंडच्या लॉर्डस् मैदानावर एक ऐतिहासिक शतक झळकावले होते. तसाच आणखीन एक खास विक्रम आगरकरच्या नावावर आहे. जो त्याने झिम्बाम्ब्वे संघाविरुद्ध खेळताना केला होता.
“झिम्बाम्ब्वे संघाविरुद्धचा तो सामना 2002 साली राजकोट येथे झाला होता. या सामन्यात अजित आगरकरने 21 चेंडूतच आपले अर्धशतक पुर्ण करण्याचा पराक्रम केला होता. भारताकडून तेव्हा कोणत्याही खेळाडूने केलेले ते जलद अर्धशतक होते. परंतु आजही हा विक्रम त्याच्याच नावावर भारताकडून आहे.”
त्याच सामन्यात पुढे अजित आगरकरने 268 च्या स्ट्राइक रेटने 25 चेंडूत तब्बल 67 धावा केल्या होत्या. यात त्याने 7 चौकार आणि 4 खणखणीत षटकार खेचले होते. ज्यामुळे भारतीय संघाने 301 धावांचा डोंगर प्रतिस्पर्धी संघापुढे उभा केला होता.
क्रमांक – 3
- खेळाडू : शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
जगातील महान लेग स्पिनर असलेला ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज गोलंदाज, त्याने जशी आपल्या गोलंदाजीने अनेक फलंदाजांची भंबेरी उडवली. तशीच आपल्या फलंदाजीनेही अनेकदा सर्वांनाच चकित केले होते.
“शेन वॉर्न याच्या नावावर कसोटी सामन्यात विक्रमी 709 बळी टिपल्याची नोंद आहे. तसेच एकही शतक न लगावता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील शेन वॉर्नच्या नावावर आहे.”
शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत 145 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 3,154 धावा केल्या आहेत. परंतु, आपल्या कोणत्याही खेळीचे रुपांतर त्याला शतकात करता आले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 99 राहिली आहे. जी त्याने न्युझीलंड संघाविरुद्धच्या सामन्यात 2001 साली पर्थ येथील मैदानावर केली होती.
क्रमांक – 4
- खेळाडू : एश्टन एगर (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाच्या या युवा खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात गोलंदाजीप्रमाणेच आपल्या फलंदाजीची चुनूक दाखवली होती. पहिल्याच सामन्यात एश्टन एगरने तब्बल 98 धावा केल्या होत्या.
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात एश्टन 11 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू (स्वर्गीय) फ्लिप ह्युजच्या साथीने 163 धावांची भागीदारी केली होती.
एश्टन एगरचा तो पदार्पण सामना होता. त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याने दोन वैयक्तिक आणि एक सांघिक विक्रम केला होता. “11 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू (गोलंदाज) म्हणून 98 धावा करणारा एगर हा पहिलाच खेळाडू होता. तसेच पहिल्याच पदार्पण सामन्यात 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा करणारा एश्टन हा पहिलाच खेळाडू होता.”
फ्लिप ह्युज आणि एश्टन एगरने तेव्हा केलेल्या 163 धावांच्या भागिदारीने ऑस्ट्रेलिया संघाने 280 चा आकडा गाठला होता. “अकराव्या विकेटसाठी करण्यात आलेली ती सर्वोच्च भागिदारी होती.”
क्रमांक – 5
- खेळाडू : वसिम अक्रम (पाकिस्तान)
पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. यातील एक विक्रम मात्र अक्रमसाठी नक्कीच खास आहे. ज्यात पाकिस्तानच्या या दिग्गज गोलंदाजाने फलंदाज म्हणुन तब्बल 257 धावांची विक्रमी खेळी केली होती.
“शेखपुरा येथे 1996 साली झिम्बाम्ब्वे संघाविरुद्धचा झालेला तो सामना वसिम अक्रमसाठी नक्कीच अविस्मरणीय होता. याच सामन्यात त्याने 12 षटकार लगावत 257 धावांची विक्रमी खेळी केली होती.” वसिम अक्रमच्या या तडाखेबाज फलंदाजीमुळेच झिम्बाम्ब्वे विरुद्धचा तो सामना अनिर्णीत राहिला होता.
अक्रमने त्या सामन्यात सक्लैन मुश्ताक याच्या साथीने तब्बल 313 धावांची भागिदारी केली होती आणि संघाची धावसंख्या 533 पर्यंत पोहचवली होती. “वसिम अक्रमने 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 257 धावांची खेळी केली होती. कोणत्याही खेळाडूने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केलेली ती सर्वात मोठी धावसंख्या होती.”
वसिम अक्रमच्या खात्यावर एकूण 916 आंतरराष्ट्रीय विकेट जमा आहेत. तसेच संघाचा प्रमुख गोलंदाज असूनही त्याने अनेकदा एक फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे.