---Advertisement---

विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीकडूनही झाल्या होत्या चूका, ‘या’ ५ निर्णायामुळे ठरला होता टीकेचा धनी

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 7:00 AM
---Advertisement---

महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार म्हणून किती मोठा आहे, हे आपण सगळे जाणतोच. त्याने भारताला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. अनेक खेळाडूंना त्यांचे करिअर बनवण्यासाठी संधी दिल्या आहेत. काही खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून योग्य वेळेला कौशल्य दाखवण्यास संधी दिली आहे. त्याने घडवलेले अनेक खेळाडू आज भारतीय संघात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

धोनीने एखाद्या स्थितीत किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल घेतलेले निर्णय अनेकवेळा योग्य ठरतात. काही वेळा त्याचे निर्णय सामान्य क्रिकेटप्रेमींना किंवा खेळाडूंना कळत नाहीत, पण त्या निर्णयाचे रूपांतर जेव्हा एखाद्या सामन्यात पाहायला मिळते तेव्हा ते चटकन लक्षात येते. परंतु धोनीचे जसे निर्णय योग्य असतात, तसेच काही निर्णय हे चुकीचेही ठरले आहेत व त्यासाठी त्याला टीकेला सामोरे जावे लागले आहे. धोनीने घेतलेले काही चुकीचे निर्णय आपण पाहूया.

२०१६ विश्वचषकामध्ये विराट कोहलीकडून गोलंदाजी करून घेणे
२०१६ साली भारताने टी२० विश्वचषकाचे आयोजन केले होते, व पहिल्याच सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. परंतु, यानंतर पाकिस्तान, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया संघांसोबतच्या सामन्यात भारताने विजय मिळवला व उपांत्यफेरीत पोहोचला. वेस्ट इंडिज सोबतच्या उपांत्यफेरी सामन्यात भारताने १९२ धावांचे लक्ष ठेवले व हे लक्ष पूर्ण करण्यासाठी वेस्ट इंडिजला शेवटच्या षटकात ८ धावांची गरज होती. यावेळी रविचंद्रन अश्विनच्या २ ओव्हर असूनही धोनीने कोहलीला गोलंदाजी दिली व वेस्ट इंडिजने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला.

२००९ विश्वचषक मध्ये रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर खेळवणे
२००९ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत धोनीने इंग्लंड विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात युवराज किंवा स्वतः फलंदाजीसाठी न जाता अष्टपैलू असणाऱ्या रवींद्र जडेजाला पाठवले. रवींद्रने ३५ चेंडूत २५ धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघावर दबाव निर्माण झाला व यामुळे भारतीय संघ ३ धावांनी हरला व स्पर्धेतून बाहेर पडला. भारतीय क्रिकेटप्रेमींना धोनीचा हा निर्णय पटला नाही व त्यांनी धोनीवर टीका केली होती.

सीएसके मधील खेळाडूंना अधिक महत्व देणे
धोनी ज्याप्रमाणे भारताचा कर्णधार होता, तसेच आयपीएल मध्ये तो चेन्नई सुपरकिंग्स संघाचा ही कर्णधार आहे. व ह्या संघात सुरेश रैना, रविचंद्रन आश्विन, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा हे खेळाडू होते. हे व इतर खेळाडू अनेक वेळा भारतीय संघात खेळताना दिसत असत. त्यांची कामगिरी चांगली आहे व ते खेळत आहेत ही गोष्ट मान्य करता येऊ शकते, पण काही काळानंतर मोहित शर्मा, रवींद्र जडेजा ह्यांची कामगिरी हवी तशी होत नव्हती, पण तरीही ते भारतीय संघातून खेळत होते. हीच गोष्ट काही काळाने सुरेश रैना सोबत झाली व तेव्हा धोनीवर टीका होण्यास सुरुवात झाली. कामगिरी नसतानाही धोनी चेन्नई संघातील खेळाडूंना भारतीय संघात प्राधान्य देत आहे अशी टीका सुरु झाली.

अनुभवी खेळाडूंना न खेळवणे
२०११ साली ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोटेशन पोलिसीचा वापर केला. या पोलिसी अंतर्गत गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर या अनुभवी खेळाडूंना न खेळवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे धोनीचे असे मत होते की हे खेळाडू शारीरिक तंदुरुस्ती व क्षेत्ररक्षणात कमी पडत आहेत. परंतु, या तिघांना न खेळवण्यामुळे संघाला पराभूत व्हावे लागले होते.

धोनीच्या या निर्णयामुळे बिशनसिंग बेदी, चंदू बोर्डे असे अनेक जेष्ठ भारतीय खेळाडूंनी प्रश्न उभे केले होते. गौतम गंभीर या निर्णयावर बोलताना असे म्हणाला कि, ‘मी प्रत्येक कर्णधाराचे प्रत्येक नियम मानतो, परंतु धोनीने घेतलेला रोटेशन पॉलिसीचा निर्णय अत्यंत चुकीचा होता’.

आयपीएल मध्ये पंचांवर नाराजी दाखवणे
‘कॅप्टन कूल’ ही पदवी मिळवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला क्वचितच राग येताना पाहिले गेले आहे. मैदानावर धोनी कोणावर रागावला आहे, हे ऐकलं तर खोटं वाटेल, पण २०१९ मध्ये आयपीएलच्या सामन्यादरम्यान असे घडले आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यादरम्यान राजस्थानच्या बेन स्टोक्सनी चेन्नईच्या मिशेल सँटनेरला जो बॉल टाकला तो फलंदाजाच्या कंबरेवरून गेला, व चेन्नईच्या खेळाडूंना अपेक्षित होते की पंच नो बॉल चा इशारा देईल.

परंतु पंचानी तसा निर्णय दिला नाही, ते धोनीला पटल नाही व तो पंचांशी बोलण्यासाठी थेट मैदानावरच आला. यावर वीरेंद्र सेहवाग असे म्हणाला की जर धोनी भारताचा कर्णधार असता आणि पंचानी चुकीचा निर्णय दिला असता, तर धोनी ने असे वर्तन केले असते का? परंतु, चेन्नईच्या संघासाठी त्याने आपली कॅप्टन कुल ही पदवी बाजूला ठेवली.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मला क्रिकेट आवडत नाही…’, दिल्लीच्या पराभवानंतर युवराज सिंगच्या प्रतिक्रियेने वेधले सर्वांचेच लक्ष

सामना हारुनही दिल्लीनं जिंकली मनं! क्रिकेटविश्वातून अशा उमटल्या प्रतिक्रिया

सात धावासांठी तीन विकेट्सची आहुती! अखेर गगनचुंबी षटकार ठोकत कोलकाताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---