आयपीएल २०२१ स्पर्धा खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक ठरत आहे. प्रत्येक सामन्यात क्रिकेट स्टार्स आपल्या खेळाची प्रतिभा मैदानावर दाखवत आहेत. या सर्वांमध्ये विशेषतः युवा भारतीय खेळाडूंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आपण या लेखात बघणार आहोत आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी करणारे असे ५ खेळाडू ज्यांना आगामी काळात भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
१) ऋतुराज गायकवाड –
चेन्नई सुपर किंग संघाचा हा स्टार ओपनर आयपीएल २०२१ मध्ये सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मागील वर्षी सुरुवातीच्या काही सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आलेल्या ऋतुराजने उत्तरार्धात शानदार कामगिरी केली होती. ऋतुराजने तोच फार्म या वर्षी देखील सुरू ठेवला आहे.ऋतुराजने आतापर्यंत ७ सामन्यात १९६ धावा केलेल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन अर्धशतकीय खेळीही केलेल्या आहेत.तंत्रशुद्ध व आक्रमक अशा दोन्ही प्रकारची फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या महाराष्ट्राच्या या खेळाडूकडून सर्वांनाच आगामी काळात फार अपेक्षा आहेत.
२) देवदत्त पडिक्कल –
आयपीएलच्या मागील हंगामात शानदार कामगिरी केलेल्या देवदत्त पडिक्कलचे नाव क्रिकेट वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेने घेतले जात आहे. मागील आयपीएलमध्ये ४८६ धावा केलेल्या पडिक्कलने आयपीएल २०२१ मध्ये देखील शानदार कामगिरी केलेली आहे. पडिक्कलने आतापर्यंत खेळलेला ६ सामन्यात १४२च्या स्ट्राईक रेटने १९६ धावा केलेल्या आहेत. या दरम्यानच त्याने एक नाबाद शतकीय खेळी देखील केली आहे. कर्नाटककडून खेळणाऱ्या या फलंदाजाला आगामी काळात भारतीय संघाची दारे निश्चितच खुली आहेत.
३) हर्षल पटेल –
आयपीएल २०२१ आतापर्यंत सर्वात जास्त यशस्वी ठरले आहे तर ते हर्षल पाटेलसाठी. २०१० साली भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा सदस्य असलेला हर्षल मागील काही काळात मात्र कामगिरीत सातत्य राखण्यात सपशेल अपयशी ठरत होता. मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्स कडून खेळल्यानंतर या वर्षी त्याला आरसीबीने आपल्या संघात समाविष्ट केले. हर्षलने देखील मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत आतापर्यंत ७ सामन्यात १७ बळी मिळवलेले आहेत. हर्षल आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी हर्षलचा विचार करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
४) वरुण चक्रवर्ती –
कोलकत्ता नाइट रायडर्सच्या सुमार कामगिरी मध्ये संघासाठी एक सकारात्मक बाब ठरलेली आहे तर ती म्हणजे फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा फॉर्म. वरुणने मागील आयपीएलमधील कामगिरीची पुनरावृत्ती करत या सीझनमध्ये देखील शानदार कामगिरी केलेली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात ७ गडी बाद केलेले आहेत. भारतीय संघात सध्या फिरकीपटूची उणीव जाणवत असल्याने वरुणची भारतीय संघात वर्णी लागली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
५)आवेश खान –
दिल्ली कॅपिटल्सच्या यशात या वर्षी सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो वेगवान गोलंदाज आवेश खान याचा. आवेशला मागच्या वर्षी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र या वर्षी त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत शानदार कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत त्याने ८ सामन्यात १४ बळी मिळवले असून सुरुवातीच्या तसेच शेवटच्या षटकांमध्ये देखील त्याने शानदार कामगिरी केलेली आहे.
महत्वाच्या बातम्या:
पायातील बूट स्टंपला लागल्याने खेळाडू झाला अजबच पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारतासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केला मदतीचा हात पुढे
IPL 2021 : बाद फेरीत स्थान मिळवण्याची चुरस वाढली, पाहा कोणते संघ पक्की करणार आपली जागा