पुणे। एसएनबीपी अकॅडमीने चुरशीच्या लढतीत जमशेदपूरच्या नवल टाटा हॉकी अकॅडमीचा पेनेल्टी शूट आऊटमध्ये तर सोनीपतच्या हर हॉकी अकॅडमीने कर्नालच्या राजा करण अकॅडमीचा पराभव करून ५ व्या एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चिचत केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत एसएनबीपी अकॅडमीच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याच्या चार सत्रांपर्यंत नवल टाटा अकॅडमी २-शून्य गोलने आघाडीवर होती. हे दोन्ही गोल टाटा अकॅडमीकडून अभिषेक टिग्गाने ७ व्या व ३६ व्या मिनिटाला केले.
चौथ्या सत्रात एसएनबीपीच्या खेळाडूंनी आपल्या खेळामध्ये बदल करून एकमेकांनी जलद पास करण्यास सुरूवात केली. त्यांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी योग्य रणनीती आखून नवल टाटा अकॅडमीच्या खेळाडंूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यातच एसएनबीपीच्या रोहन सिंगला एक योग्य पास मिळाला त्या पासचे रूपांतर गोलमध्ये करण्यात त्याने कोणतीही चूक केली नाही. या गोलमुळे एसएनबीपीने एक गोलची आघाडी कमी केली. तरी सुध्दा एसएनबीपीचे खेळाडू जिद्दीने लढत होते.
दुसरीकडे त्यांची गोल करण्याचे प्रयत्न सुरूच होते. शेवटची काही मिनिटे राहिली असताना एसएनबीपीच्या रोहन सिंगला पुन्हा दुसरी संधी मिळाली. या संधीचा फायदा सुध्दा त्याने घेताना कोणतीही चूक केली नाही. एसएनबीपीने दुसरा गोल करून नवल टाटा अकॅडमीला धक्का देत २-२ गोल बरोबरी साधली.
पेनल्टी शूट आऊटमध्ये एसएनबीपीच्या कृष्णा मोहन, झैद मुहोम्मद खान व आकाश पाल या तिघांनी गोल केले. दुसरीकडे देशातील एक नावाजलेली असलेल्या नवल टाटा अकॅडमीचे असिम इक्का, जोलेन टॉपनो व अंकुश हे तीघे गोल करण्यात अयशस्वी झाले. यावेळी एसएनबीपीचा गोलरक्षक राहुल पालने उत्कृष्ट गोल रक्षण करीत जोलेन टॉपनो व अंकुश यांचे चेंडू चपळाईने आडविले व असिम इक्काने चेंडू गोलच्या बाहेर टाकला. आॅक्टोबरमध्ये झालेल्या हॉकी इंडिया ज्युनियर हॉकी राष्ट्रीय स्पर्धेत नवल टाटा हॉकी अकॅडमी उपविजेती होती.
दुसऱ्या लढतीत सोनीपतच्या हर हॉकी अकॅडमीने कर्नालच्या राजा करण अकॅडमीचा ५-० गोलने पराभव करून उपांत्यफेरीतील आपली जागा निश्चित केली. विजयी संघाकडून मन्नू मलिक ५ व्या.व ३३ व्या. मिनिटा असे २ गोल, जीतपालने १२ व्या, सुखविंदरने १८ व्या व साहिल रूहालने ५९ व्या. मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला.
उद्या रविवारी दुपारी १ वाजता हर हॉकी अकॅडमी, सोनीपत विरूध्द एसएनबीपी अकॅडमी, पुणे तर दुपारी ३ वाजता सेल हॉकी अकॅडमी विरूध्द रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर, झारखंड यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होेतील.
निकाल :
-एसएनबीपी अकॅडमी : २ गोल (पूर्ण वेळेत : रोहन सिंग ५२ व्या व ५३ व्या मि. -२ गोल; पेनेल्टी शूट आउटमध्ये ३ गोल : ( कृष्णा मोहन, झैद मुहोम्मद खान, आकाश पाल : प्रत्येकीयांनी गोल केले) वि. वि. नवल टाटा हॉकी अकॅडमी : २ गोल (अभिषेक टिग्गा ७ व्या व ३६ व्या मि. -२ गोल), पेनेल्टी शूट आऊट : शून्य गोल (असिम इक्का, जोलेन टॉपनो, अंकुश हे गोल करण्यात अयशस्वी झाले).
-हर हॉकी अकॅडमी, सोनीपत : ५ गोल (मन्नू मलिक ५ व्या.व ३३ व्या. मि.-२ गोल, जीतपाल १२ व्या.-१गो., सुखविंदर १८ व्या.-१ गो., साहिल रूहाल ५९ व्या. मि.-१ गो.) वि. वि. राजा करण अकॅडमी, कर्नाल : शून्य गोल.
-सेल हॉकी अकॅडमी, ओडिसा: ८ गोल (मुकेश टेटे ४ थ्या मि.-१गो., रोहित सिंग १२व्या व ५७ व्या मि. -२गो., निशाद सोनू १३ व्या. -१ गो., एक्का अनमोल ज्यु. २१, ३०, ३७, ४७ व्या मि. -४ गो) वि. वि. आर. के. रॉय अकॅडमी, पटणा : १ गोल (मोह्ममद दानिश ८ व्या मि.-१ गोल).
-रिजनल डेव्हलपमेंन्ट सेंटर, झारखंड : २ गोल (अनुज बारा ५ व्या मि.-१ गो., हर्षित इंडवार २० व्या मि.-१ गो.) वि. वि. नागपूर हॉकी अकॅडमी : १ गोल (हिमांशू यादव ३६ व्या मि. १ गोल).






