पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत नेदरलँडच्या टॅलन ग्रीक्सपूर, फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत नेदरलँडच्या टॅलन ग्रीक्सपूर याने रशियाच्या व आठव्या मानांकित एस्लन कारास्तेवचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1 तास 21 मिनिटे चालला. पहिला सेट टॅलनने एस्लनविरुद्ध 7-6(4) असा टायब्रेकमध्ये जिंकून आघाडी मिळवली.
दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या एस्लनला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये टॅलनने एस्लनची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा 6-1असा सहज जिंकून अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल टाकले.
दुसऱ्या चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झी याने दुसऱ्या मानांकित व नेदरलँडच्या बोटिक व्हॅन डी झांडशुल्पचा 7-6(5), 6-7(5), 6-1 असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. हा सामना 2तास 29 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये बोन्झीने सुरेख सुरुवात करत दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व सामन्यात 3-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर बोटिक आक्रमक खेळ करत पाचव्या गेममध्ये बोन्झीची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. 12 व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये बोन्झीने बिनतोड सर्व्हिस व वेगवान खेळ करत हा सेट 7-6(7-5)असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये बोटीकने जोरदार खेळ करत आठव्या गेममध्ये बोन्झीची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-6(7-5)असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये बोन्झीने चतुराईने खेळ करत दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये बोटीकची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1असा सहज जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
दुहेरीत उपांत्य फेरीत बल्गेरियाच्या सँडर गिले व जोरन व्लिगेन यांनी अमेरिकेच्या राजीव राम व ग्रेट ब्रिटनच्या जॉय सॅलिसबरी या अव्वल मानांकित जोडीचा टायब्रेकमध्ये 7-6(3),7-6(4) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा सूरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजने जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार
ब्रेकिंग! सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय, ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळणार कारकिर्दीचा शेवटचा सामना