---Advertisement---

आयपीएल २०२२ खरंच वेगळं असणार! ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंशिवाय खेळला जाणार यंदाचा हंगाम

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 6:20 PM
Suresh-Raina-and-Harbhajan-Singh
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा लिलाव (IPL 2022 Auction) बंगळुरू येथे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलावात एकूण ६०० खेळाडूंचा सहभाग होता. पण त्यातील केवळ २०४ खेळाडूंवर बोली लागली. त्यासाठी १० संघांनी मिळून ५५१ कोटी रुपये खर्च केले. यंदाचा हा आयपीएल लिलाव मेगा लिलाव होता. त्यामुळे या हंगामात सर्वच फ्रँचायझींची नव्याने संघबांधणी करण्यात आली आहे. तसेच या हंगामापासून गुजराज टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स असे दोन नवे संघ आयपीएलमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे हे दोन नवे संघ देखील जुन्या ८ संघांसह लिलावात सहभागी झाले होते.

दरम्यान, या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांच्या बोली लागल्या, तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंवर फ्रँचायझींनी रस दाखवला नाही. त्याचबरोबर या आयपीएल हंगामापूर्वीच काही दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आहेत, तर काहींनी वैयक्तिक कारणांमुळे या हंगामातून माघार घेतली. त्यामुळे हा हंगाम काहीसा वेगळा असणार आहे. या लेखातूनही आपण अशाच ६ दिग्गज खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे आयपीएल २०२२ चा (IPL 2022) भाग नसणार आहेत.

१. सुरेश रैना (Suresh Raina)
मिस्टर आयपीएल म्हणून ज्या खेळाडूला ओळखले जाते तो खेळाडू म्हणजे सुरेश रैना. त्याने आयपीएलमध्ये प्रत्येक वर्षी दमदार कामगिरी केली आहे. मात्र गेल्यावर्षी त्याची कामगिरी खराब झाली होता. असे असले तरी तो आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने २०५ सामने आत्तापर्यंत खेळले असून ५५२८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ शतक आणि ३९ अर्धशतके केली आहेत. पण, रैनाला यंदा कोणत्याच फ्रँचायझीने विकत घेतले नाही.

२. एबी डिविलियर्स (AB de Villiers)
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता, पण त्याने आयपीएल २०२२ पूर्वी क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो या आयपीएल हंगामाचा भाग नसणार आहे. त्याने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांत ५१६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ शतकांचा आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकूण सहाव्या क्रमांकाचा खेळाडू आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा परदेशी खेळाडू आहे.

३. ख्रिस गेल (Chris Gayle)
टी२० क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू असलेल्या ख्रिस गेलला भारताबरोबरच जगभरात मोठी लोकप्रियता आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळतानाही अनेकदा मोठ्या खेळी केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याची १७५ धावांची आयपीएलमध्ये सर्वोच्च खेळी आहे. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकूण सातव्या क्रमांकाचा खेळाडू आहे, तर तिसऱ्या क्रमांकाचा परदेशी खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये १४२ सामन्यांत ४९६५ धावा केल्या आहेत. मात्र, गेलने या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे.

४. अमित मिश्रा (Amit Mishra)
भारतीय क्रिकेटमधील एक चांगला फिरकीपटू म्हणून ओळखला जाणाऱ्या अमित मिश्राने आयपीएलमध्ये अनेकदा दमदार कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत १५४ सामने आयपीएलमध्ये खेळले असून यामध्ये त्याने १६६ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा एकूण तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, तर पहिल्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज आहे. याशिवाय अमित मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये ३ हॅट्रिक आहेत. मात्र, आयपीएल २०२२ साठी मिश्राला कोणत्याच संघाने पसंती दाखवली नाही.

५. पियुष चावला (Piyush Chawala)
भारतीय गोलंदाज पियुष चावला हा देखील आयपीएलमधील एक दिग्गज गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये आपल्या संघांसाठी खेळताना अनेकदा चांगली कामगिरी करत विजयांमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याने आयपीएलमध्ये १६५ सामने खेळले असून १५७ विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज आहे. मात्र, तो देखील यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

६. हरभजन सिंग (Harbhajan Singh)
भारताचा दिग्गज फिरकीपटू असलेला हरभजन सिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स अशा तीन वेगवेगळ्या संघांकडून खेळला. पण यातील मुंबई संघाकडून तो सर्वाधिक काळ खेळला, तसेच मुंबईचे काही सामन्यांत नेतृत्त्वही केले. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १६३ आयपीएल सामने खेळले असून त्याने १५० विकेट्स घेतल्या आहते. त्यामुळे तो सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे, तर अमित आणि चावलाच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज आहे. मात्र, त्यानेही आयपीएल २०२२ पूर्वी निवृत्ती घेतली असल्याने तो या हंगामाचा भाग नसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२२ च्या सुरुवातीच्या सामन्यांना मॅक्सवेल मुकणार? जाणून घ्या सविस्तर

आयपीएलच्या बाजारात एका वर्षात उतरली ‘या’ खेळाडूंची किंमत; सहन करावा लागला तोटा

IPL BREAKING| मुंबईकर श्रेयसकडे केकेआरची धुरा! आगामी हंगामात करणार कोलकाताचे नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---