पुणे । रोडपाठोपाठ सायकलिंग ट्रॅक प्रकारातही महाराष्ट्राने भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राने ट्रॅकमध्ये ३५ गुण मिळवले, तर दिल्लीने २३ गुणांसह उपविजेतेपद मिळवले.
ट्रॅक सायकलिंगचे प्रकार म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये झाले. स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात झारखंडने १५ गुण मिळवले, तर मुलींच्या गटात महाराष्ट्राने १४ गुणांसह बाजी मारली. १७ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या गटात दिल्लीने वर्चस्व राखले. मुलांच्या गटात दिल्लीने ६, तर मुलींच्या गटात १० गुण मिळवले. स्पधेर्तील १९ वर्षांखालील मुलांच्या गटात दिल्लीने ७, तर मुलींच्या गटात कर्नाटकने ९ गुण मिळवले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात शुटिंग हॉलमध्ये स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी जायंट स्पोर्टस् फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण पाटील, एसजीएफआयचे कन्हैया गुर्जर, संजय साठे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, दिपाली पाटील, प्रताप जाधव, दिपाली शिळदणकर, संजय सातपुते आदी उपस्थित होते. रोड सायकलिंगसाठी महाराष्ट्राचे प्रशिक्षक व व्यवस्थापक दिपाली पाटील, दिपाली शिळदणकर, प्रशिक्षक दर्शन बारगुजे, व्यवस्थापक संदीप जाधव यांनी राज्याच्या क्रीडापटूंना मार्गदर्शन केले.