सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध खेळला गेलेला दुसरा टी20 तर जिंकलाच, पण एक मोठा पराक्रमही केला. भारतीय क्रिकेटच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेला हा पराक्रम आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश दुसऱ्या टी20 मध्ये भारताने एकूण 7 गोलंदाजांचा वापर केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने किमान एक विकेट घेतली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 7 गोलंदाजांनी कोणत्याही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी 1 बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताने 92 वर्षांपूर्वी 1932 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून 7 भारतीय गोलंदाजांना कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकाही सामन्यात किमान एक विकेट घेता आली नव्हती.
खरंतर, 7 गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात चार वेळा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 वेळा (7 पूर्ण सदस्य संघ) विकेट घेतल्या आहेत आणि टी-20 मधील ही 9वी घटना आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा भारत हा चौथा पूर्ण सदस्य देश ठरला आहे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये आठ गोलंदाजांनी एका डावात विकेट घेतलेली नाही.
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग आणि यष्टिरक्षक संजू सॅमसन वगळता प्रत्येक खेळाडूने बांग्लादेशविरुद्ध गोलंदाजी केली होती.
या दरम्यान नितीश रेड्डी आणि वरुण चक्रवर्ती यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंग, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि मयंक यादव यांनी 1-1 बळी घेतला.
दुसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना नितीश रेड्डी आणि रिंकू सिंगच्या अर्धशतकांच्या जोरावर पाहुण्यांना 222 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 135 धावा करू शकला. भारताने हा सामना 86 धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील तिसरा टी20 शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे.
हेही वाचा-
कर्णधार सूर्यकुमार यादवने या खेळाडूला दिलं सामना जिंकण्याचं श्रेय, म्हणाला “जसे मला हवे होते…”,
‘भारताने खरा हिरा गमावला…’, रतन टाटा यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा
भारताच्या ‘या’ दिग्गजाच्या नावावर असते 120 शतक पण…