क्रिकेट इतिहासात अनेक विचित्र योगायोग झाले आहेत आणि कदाचित ते पुढेही होत राहतील. या खास लेखात क्रिकेट इतिहासातील अशा ७ विचित्र योगायोगांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
क्रिकेट इतिहासातील आश्चर्यचकित करून टाकणारे ७ योगायोग- 7 Strange Coincidences of Cricket History that Everyone Is Shocked to Know
७. सचिन, सेहवाग आणि रोहितने केलेल्या द्विशतकामुळे १५३ धावांनी विजय
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) २४ फेब्रुवारी २०१० रोजी ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या वनडे कारकीर्दीतील सर्वात मोठी खेळी केली होती. त्याने पहिल्यांदाच वनड क्रिकेटमध्ये २०० धावांचा टप्पा गाठण्याचा कारनामा केला होता. सचिनच्या धडाकेबाज द्विशतकी खेळीमुळे भारतीय संघाने १५३ धावांनी विजय मिळविला होता.
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिनच्या द्विशतकाच्या एका वर्षानंतर त्याचा विक्रम मोडीत काढला. त्याने ८ डिसेंबर २०११ रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध २१९ धावांची ऐतिहासिक खेळी करत एक नवीन विक्रम बनवला होता. त्या सामन्यातही भारतीय संघाने १५३ धावांनी विजय मिळविला होता.
वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झाला. तो कारनामा केला होता भारतीय वनडे संघाचा सध्याचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma). त्याने याआधीही द्विशतक ठोकले होते. परंतु रोहितने १३ नोव्हेंबर, २०१४ रोजी कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची ऐतिहासिक खेळी करत एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तसेच, विशेष म्हणजे भारताने तोही सामना १५३ धावांनी जिंकला होता.
६. ऍलिस्टर कूक + मायकल क्लार्क = सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण २०० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे.
२०१३ मध्ये पर्थ येथे ऍशेस मालिकेतील खेळण्यात आलेला कसोटी सामना विशेष होता. कारण इंग्लंडचा दिग्गज कर्णधार ऍलिस्टर कूक (Alastair Cook) आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) आपला १००वा कसोटी सामना खेळत होते. त्या सामन्यानंतर जेव्हा त्यांच्या कारकीर्दीचे आकडे समोर आले, तेव्हा योगायोगच घडला.
कूकने आपले १०० कसोटी सामने खेळल्यानंतर २५ शतकांच्या मदतीने ७९५५ धावा केल्या होत्या. जेव्हा क्लार्कने आपले १०० कसोटी सामने खेळल्यानंतर २६ शतकांच्या मदतीने ७९६४ धावा केल्या होत्या. आता हे आकडे एकत्र केले, तर २०० कसोटी सामन्यात ५१ शतकांच्या मदतीने १५९१९ धावा होतात. ही आकडेवारी जवळपास सचिनच्या आकडेवारी सारखेच होते.
या सामन्याच्या काही काळापूर्वी निवृत्त झालेल्या सचिनने आपल्या कारकीर्दीत २०० कसोटी साामन्यात ५१ शतकांच्या मदतीने १५९२१ धावा केल्या होत्या.
५. २३ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स संघाची सर्वाधिक जास्त आणि सर्वाधिक कमी धावसंख्या
आयपीएल इतिहासातील २३ एप्रिल ही तारीख विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (Royal Challengers Bangalore) खूपच विचित्र आहे. ही तारिख अशी आहे, जी आरसीबी संघाला स्मरणदेखील करायला लावते आणि विसरायलाही लावते.
मागील ७ वर्षांपूर्वी म्हणजेच २३ एप्रिल २०१३ या तारखेला आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने (Chris Gayle) पुणे वॉरिअर्सविरुद्ध अवघ्या ६६ चेंडूत १७५ धावांची दीडशतकी खेळी केली होती. त्या सामन्यात आरसीबीने ५ विकेट्स गमावत २६३ धावा केल्या होत्या. ही टी२० सामन्यांतील वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्यां एक आहे. त्या सामन्यादरम्यान गेलने टी२०त सर्वाधिक जलद शतक करण्याचा विक्रमदेखील आपल्या नावावर केला होता.
आयपीएलच्या १० व्या मोसमातील २७ वा सामना २३ एप्रिल २०१७ला कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी संघात सामना खेळण्यात आला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकात सर्वबाद १३१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा सामना करताना आरसीबी संघाने ९.४ षटकात सर्वबाद केवळ ४९ धावाच केल्या. ही धावसंख्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक कमी धावसंख्या आहे.
४. गांगुली, धोनी आणि विराटच्या सर्वाधिक १८३ धावा
सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहली या तिन्ही भारतीय खेळाडूंना यशस्वी कर्णधार म्हटले जाते. या तिघांमध्ये एक योगायोग आहे. खरंतर या तिघांचीही सर्वाधिक धावसंख्या ही एकसारखी म्हणजेच १८३ आहे.
भारतीय संघाचा तत्कालिन कर्णधार गांगुलीने (Sourav Ganguly) १९९९ च्या विश्वचषकात १६ मे रोजी टांटन येथे श्रीलंकेविरुद्ध गांगुलीने १५८ चेंडूत ७ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १८३ धावांची खेळी केली होती.
धोनीने (MS Dhoni) ३१ ऑक्टोबर २००५ रोजी जयपूर येथे श्रीलंकेविरुद्ध १४५ चेंडूत १० षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने नाबाद १८३ धावा ठोकल्या होत्या.
विराटने (Virat Kohli) आशिया चषकात १८ मार्च २०१२ रोजी ढाका येथे पाकिस्तानविरुद्ध चौकारांचा पाऊस पाडला होता. त्याने १४८ चेंडूत १ षटकार आणि २२ चौकारांच्या मदतीने १८३ धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे भारताने ३३० धावांचे आव्हान ४ विकेट्स गमावत पूर्ण केले होते.
विशेष म्हणजे या तिघांच्याही वनडे कारकिर्दीतील १८३ धावांची खेळी ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.
३. पहिल्या आणि १०० वर्षांनंतरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मेलबर्न मैदानावर ४५ धावांनी विजय
क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना मार्च, १८७७ रोजी खेळण्यात आला. तो सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळण्यात आला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी विजय मिळविला होता.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर तब्बल १०० वर्षांनंतर १९७७ रोजी त्याच मैदानावर त्याच दोन संघांमध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. विशेष म्हणजे तो सामनादेखील ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनीच जिंकला होता.
२. धोनीचे वनडे आणि कसोटी दोन्हीमध्ये पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांचे पहिले शतक
धोनीने वनडे आणि कसोटीत पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांचे पहिले शतक ठोकले आहे. २००५ मध्ये विशाखापट्टनम येथे त्याने पाकिस्तानविरुद्ध एका वनडे सामन्यात १२३ चेंडूत ४ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १४८ धावांची खेली केली होती.
त्या सामन्यात धोनीच्या खेळीमुळे भारतीय संघाने ५० षटकात ९ बाद ३५६ धावा केल्या होत्या. दरम्यान पाकिस्तान संघ २९८ धावांवर सर्वबाद झाला होता. हा धोनीच्या वनडे क्रिकेट कारकीर्दीतील पहिले शतक होते.
त्यानंतर त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतकदेखील पाकिस्तानविरुद्ध खेळतानाच केले होते. तसेच, यामध्येही त्याने १४८ धावांचीच शतकी खेळी केली होती.
१. जन्मतारीख ८-४-६३ आणि कसोटी क्रिकेटमध्ये धावाही आहेत ८४६३
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी खेळाडू ऍलेक स्टीवर्ट असे एकमेव खेळाडू आहेत, ज्यांची जन्मतारीख आणि कसोटी कारकीर्दीतील धावा अगदी सारख्याच आहेत. स्टीवर्ट यांचा जन्म ८ एप्रिल, १९६३ झाला होता आणि त्यांनी त्यांच्या कसोटी कारकीर्दीतही ८,४६३ धावा केल्या आहेत. त्यांना इंग्लंडकडून एकूण १३३ कसोटी सामने खेळले आहेत.
त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९८९ साली केली होती. त्यांनी आपला पहिला वनडे सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या शानदार फलंदाजीने नेहमीच चांगली कामगिरी केली. त्यामुळे ते अनेक काळ संघाचा भाग होते.
कसोटीत त्यांनी १५ शतके ठोकली आहे. ज्यामध्ये त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ही १९० होती. जर त्यांच्या वनडे कारकीर्दीवर नजर टाकली, तर त्यांनी एकूण १७० वनडे सामने खेळले. त्यात त्यांनी ३१.६० च्या सरासरीने तब्बल ४,६७७ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४ शतके आणि २८ अर्धशतकेही ठोकली आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-२०११ विश्वचषक विजेत्या संघातील ५ असे हिरो, ज्यांचे योगदान फारसे कुणाला आठवत नाही
-बापरे! ८०पेक्षा जास्त सामने खेळून आयपीएलमध्ये एकही चौकार मारता न आलेले क्रिकेटर
-नाडाने भारतीय संघाच्या या ५ खेळाडूंना पाठविली नोटीस; २ महिला खेळाडूंचाही समावेश