काही दिवसांपूर्वीच १९ वर्षांखालील भारतीय संघाने पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकाचे (U19 World Cup) विजेतेपद मिळवले. १९ वर्षांखालील भारतीय संघाचे (U19 Team India) हे पाचवे विश्वविजेतेपद होते. दरम्यान, वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारताने कोविड-१९ मुळे बराच संघर्ष केला. या स्पर्धेदरम्यान भारताचे काही खेळाडू कोविड-१९ पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आठळले होते. पण भारतीय संघाचा खरा संघर्ष हा स्पर्धेसाठी कॅरेबियन बेटांवर पोहचल्यापासूनच सुरू झाला होता.
माध्यमांतील वृत्तानुसार जेव्हा भारतीय संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पोर्ट ऑफ स्पेन येथे पोहचला होता, तेव्हा सात खेळाडूंना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. त्यामागे कारण होते की, भारताच्या या खेळाडूंनी कोरोना लस घेतली नव्हती. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा भारतात जाण्यास सांगण्यात आले होते. ही घटना जानेवारी महिन्याच्या सुरुवातीची आहे.
खरंतर, ज्यावेळी भारताचा युवा संघ १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी रवाना झाला होता, तेव्हा भारतात १८ वर्षांखालील नागरिकांसाठी कोरोना लस (Corona Vaccine) देण्यास सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे काही खेळाडूंना लस देण्यास आली नव्हती. मात्र, ही गोष्ट पोर्ट ऑफ स्पेनच्या विमानतळावरील अधिकारी मानण्यास तयार नव्हते. याबद्दल संघ व्यवस्थापक लोबजांग जी तेनजिंग यांनी माहिती दिली आहे.
विमानतळावर भारताच्या खेळाडूंना २४ तास थांबवून ठेवण्यात आले होते. या खेळाडूंमध्ये रवी कुमार आणि अंगक्रिश रघुवंशी यांचाही समावेश होता. दरम्यान, खेळाडूंना विमानतळावर थांबवून घेतल्यानंतर भारत सरकारशी संपर्क करण्यात आला होता, त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारशी चर्चा केली. या चर्चेनंतर भारताच्या खेळाडूंना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.
भारतीय खेळाडू आढळले होते कोरोना पॉझिटिव्ह
दरम्यान, स्पर्धेतील पहिलाच सामना झाल्यानंतर भारताचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार यश धूलचाही समावेश होता. पण हे खेळाडू बाद फेरीपूर्वी पूर्ण बरे झाले होते.
ही संकटं येऊनही भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात भारतासमोर इंग्लंडचे आव्हान होते. पण भारताने अंतिम सामनाही सहज जिंकला आणि विश्वचषक विजेतेपदावर नाव कोरले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सर्व ठिक, पण…’, कर्णधार रोहित शर्मा झाला पत्नी रितिकाकडूनच ट्रोल
Video: टीम इंडियाच्या बसमध्ये चढला ‘पुष्पा’ फिवर! चहलसह हे खेळाडू म्हणतायेत, ‘झुकूंगा नही’