एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात १९७१ मध्ये झाली आणि तेव्हापासून बरेच वेगवेगळे विक्रम नोंदवले गेले आहेत. शतकांच्या विक्रमांची नोंदीही यात समाविष्ट आहे. अनेक फलंदाजांनी एकदिवसीय सामन्यात शतके ठोकून विक्रम केले आहेत, ज्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विश्वविक्रम आहे.
याशिवाय एकदिवसीय सामन्यात पदार्पणात शतक झळकावणारे १५ फलंदाज आहेत. या यादी मध्ये भारतीय संघातील के.एल. राहुलच्या नावाचा देखील उल्लेख आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण करत शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव पुरुष भारतीय फलंदाज आहे.
त्याचप्रमाणे असे बरेच फलंदाज आहेत ज्यांनी आपल्या शेवटच्या एकदिवशीय सामन्यात शतक झळकावण्याचा अनोखा विक्रम नोंदविला आहे. या विक्रमी यादीमध्ये नेदरलँड सर्वात जास्त ३ फलंदाज आहेत, तर विशेष म्हणजे या यादीमध्ये एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही.
आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम करणाऱ्या फलंदाजांवर नजर टाकूया –
१. डेनिस अमिस – इंग्लंड (Dennis Amis)
इंग्लंडच्या डेनिस अमिसने एकदिवशीय सामन्यात पदार्पण करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले आणि असा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला, परंतु १९७७ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला आणि शतक झळकावत अतिशय अनोखा विक्रमही नोंदविला.
ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडच्या डेनिस अमिसने १०८ धावांच्या मदतीने ५४.२ षटकांत २४२ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने ८ विकेट गमावून विजय मिळविला.
२. क्लाईव्ह रॅडली-इंग्लंड (Clive Radley)
१९७८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा क्लाईव्ह रॅडलीने १९७८ मध्येच शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. कारकीर्दीत फक्त ४ एकदिवसीय सामने खेळणार्या रॅडलीने पहिल्या सामन्यात ७९ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्यांनी शेवटचा सामना खेळला आणि ११७ धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडने त्यांच्या ११७ धावांच्या मदतीने २७५/५ धावा केल्या. २७६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाला १५२ धावा करता आल्या. परंतु, या शानदार खेळीनंतर रॅडली इंग्लंडकडून कधीही एकदिवसीय सामने खेळले नाहीत.
३. डेस्मंड हेन्स-वेस्ट इंडीज (Desmond Haynes)
१९७८ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे डेस्मंड हेन्स हे त्या काळातील दिग्गज फलंदाजांपैकी एक मानले जात होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७ एकदिवसीय शतकांचा विक्रम त्यांच्या नावावर होता, जो नंतर सचिन तेंडुलकरने मोडला.
१९७८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पण सामन्यात शतक झळकावणाऱ्या हेन्स यांनी १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध पोर्ट ऑफ़ स्पेनमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आणि त्या सामन्यात त्यांनी ११५ धावांची शतकी खेळी केली.
वेस्ट इंडीजने २६५/७ धाव करून इंग्लंडला २६५ धावांचा लक्ष दिलं. परंतु पावसामुळे इंग्लंडला ३६ षटकांत २०९ धावांचा लक्ष देण्यात आलं, पण इंग्लंड संघ ९ बाद १९३ धावाच करू शकला आणि वेस्ट इंडीजने १५ धावांनी हा सामना जिंकला.
४. फेईको क्लोप्पेनबुर्ग – नेदरलँड (Feiko Kloppenburg)
सप्टेंबर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळणार्या फेईको क्लोप्पेनबुर्गने अखेरचा एकदिवसीय सामना २००३ च्या विश्वचषकामध्ये नामिबियाविरुद्ध खेळला होता.
ब्लोमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात फेईको क्लोप्पेनबुर्गने १२१ धावांची शतकी खेळी साकारली होती आणि क्लास-यान व्हॅन नर्टविक (Klaas-Jan van Noortwijk) (नाबाद १३४) सह दुसऱ्या विकेटसाठी २२८ धावांची चांगली भागीदारी केली. नेदरलँड संघाने ३१४/४ अशी मोठी धावसंख्या रचली, ३१४ या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ केवळ २५० धावाच करू शकला. क्लोप्पेनबुर्गने गोलंदाजीमध्येहीउत्तम कामगिरी दाखवत ४ बळी घेतले.
५. क्लास-यान व्हॅन नर्टविक – नेदरलँड (Klaas-Jan van Noortwijk)
१९९६ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या क्लास-यान व्हॅन नर्टविक यांनी फेईको क्लोप्पेनबुर्ग प्रमाणेच २००३ च्या विश्वचषकामध्ये नामीबियाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. ब्लोमफॉन्टेन येथे झालेल्या सामन्यात नर्टविकने नाबाद १३४ धावांची खेळी केली होती आणि नेदरलँडच्या संघाने ६४ धावांनी विजय मिळविला. मात्र, या डावाखेरीज त्याची एकदिवसीय कारकीर्द काही खास नव्हती.
६. जेम्स मार्शल – न्यूझीलंड (James Marshall)
२००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेम्स मार्शलने २००८ मध्ये आयर्लंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला. त्या सामन्यात जेम्स मार्शलने १४१ चेंडूंत १६१ धावांची शानदार खेळी केली होती आणि ब्रेंडन मॅकलम (१६६) सोबत पहिल्या विकेटसाठी २७४ धावा जोडल्या.
अॅबर्डीनमध्ये न्यूझीलंडने प्रथमच ४०० चा आकडा पार केला आणि ४०२/२ धावा केल्या. ४०३ धावांचा डोंगर पार करण्यास आयर्लंड संघ अपयशी ठरला. आयर्लंड संघाने सर्व बाद फक्त ११२ धावाचं केल्या. न्यूझीलंडने २९० धावांनी विजय मिळवला, जे वनडेमध्ये सर्वाधिक धावांनी जिंकण्याच्या दृष्टीने आजही विश्वविक्रम आहे.
७. रायन टेन डोशेट – नेदरलँड (Ryan ten Doeschate)
रायन टेन डोशेटने २००६ मध्ये श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि २०११ च्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. कोलकातामध्ये नेदरलँडने रायन टेन डोशेट (१०६) च्या मदतीने ३०६ धावा केल्या. त्या अनुषंगाने पॉल स्टर्लिंगच्या (Paul Stirling) शतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडने केवळ ४ विकेट गमावून विजय मिळविला होता. रायन टेन डोशेटने विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु २०१८ मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला मात्र, परतल्यानंतर त्याला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि म्हणूनच या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट आहे.
८. रिली रूसो – दक्षिण अफ्रीका (Rilee Rossouw)
२०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रिली रुसोने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी हॅम्पशायरबरोबर कोलपॅक करारावर स्वाक्षरी केली आणि यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.
केपटाऊनमधील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात रिली रुसोने ११८ चेंडूत १२२ धावा केल्या होत्या आणि दक्षिण अफ्रीका संघाच्या ३२७/८ धावा झाल्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघ सर्व बाद २९६ धावा करू शकला. त्यात डेव्हिड वॉर्नरने १७३ धावांची शतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५-० ने मालिका आपल्या खिशात घातली.