आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे या क्रिकेट प्रकारात अनेक फलंदाजांनी भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध शानदार प्रदर्शन केले आहे. आतापर्यंत ७ खेळाडूंनी भारताविरुद्ध वनडेत २०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये सनथ जयसूर्या हा अव्वल क्रमांकावर आहे. त्याने भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक २८९९ धावा केल्या आहेत. जयसूर्यानंतर कुमार संगकारा २७०० धावांसह दुसऱ्या तर माहेला जयवर्धने २६६६ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, इंजमाम-उल-हक (२४०३), तिलकरत्ने दिलशान (२२५५), रिकी पॉटिंग (२१६४) आणि सईद अनवर (२००२) यांचा समावेश होतो.
जर वनडेत भारताविरुद्ध सर्वाधिक शतके मारणाऱ्या फलंदाजांविषयी पाहायचे झाले तर, एकूण १४ फलंदाजांनी भारताविरुद्ध वनडेत ४ किंवा त्यापेक्षा जास्त शतके ठोकली आहेत. यामध्येही श्रीलंकेच्या एका फलंदाजाने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि वनडेत भारताविरुद्ध ना केवळ सर्वाधिक धावा तर सर्वाधिक शतके ठोकण्याचाही कारनामा केला आहे.
या लेखात त्या १४ फलंदाजांपैकी टॉप-४ फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करणारे ४ फलंदाज. (4 Batsman Who Hit Most Centuries Against India In ODI)
४. कुमार संगकारा – ६ शतके
श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने भारताविरुद्ध ७६ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ७१ डाव खेळत ६ शतकांच्या मदतिने २७०० धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद १३८ धावांचा समावेश आहे. या धावा त्याने २००५साली जयपुर येथील सामन्यात केल्या होत्या. याव्यतिरिक्त संगकाराने भारताविरुद्ध २००७मध्ये राजकोट येथे ११० धावा, २००८मध्ये एडलेड येथे १२८ धावा, २०१२मध्ये होबर्ट येथे १०५ धावा, हंबनटोटा येथे १३३ धावा आणि २०१४मध्ये फतुल्लाह येथे १०३ धावा केल्या होत्या.
३. रिकी पाॅंटिंग – ६ शतके
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाॅंटिंगने भारताविरुद्ध वनडेत ६ शतके ठोकली आहेत. पाॅंटिंगने भारताविरुद्ध ५९ सामन्यांत ५९ डाव खेळत ६ शतकांच्या आणि ९ अर्धशतकांच्या मदतीने २१६४ धावा केल्या आहेत. पाॅंटिंगने वनडेत भारताविरुद्ध सर्वाधिक नाबाद १४० धावा केल्या होत्या. हा कारनामा त्याने २००३ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात केला होता.
या व्यतिरिक्त पाॅंटिंगने भारताविरुद्ध वनडेत २००० साली मेलबर्न (११५), २००१ साली विशाखापट्टनम (१०१), २००३ साली बेंगलोर (नाबाद १०८), २००८ साली सिडनी (१२४) आणि २०११ सालच्या विश्वचषकात अहमदाबाद (१०४) येथे शतकीय खेळी केल्या होत्या.
२. एबी डिविलियर्स – ६ शतके
दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सचे भारताविरुद्ध वनडेतील प्रदर्शन दमदार आहे. डिविलियर्सने भारताविरुद्ध एकूण ३२ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६ शतके आणि ५ अर्धशतके मारत १३५७ धावा केल्या. यामध्ये त्याच्या सर्वाधिक ११९ धावांचा समावेश आहे, ज्या त्याने २०१५ला मुंबई येथील सामन्यात केल्या होत्या.
शिवाय, डिविलियर्सने भारताविरुद्ध २०१०ला ग्वालियर येथे नाबाद ११४, अहमदाबाद येथे नाबाद १०२, २०१३ला सेंचुरियन येथे १०९ आणि २०१५ला कानपुर येथे नाबाद १०४ आणि चेन्नई येथे ११२ धावा केल्या होत्या.
१. सनथ जयसूर्या – ७ शतके
भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम श्रीलंकाच्या महान फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. त्याने एकूण ७ शतके केली आहेत. जयसूर्याने भारताविरुद्ध ८९ वनडे सामने खेळत २८९९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १४ अर्धशतकांचाही समावेश आहे. जयसूर्याने भारताविरुद्ध सर्वाधिक १८९ धावा केल्या आहेत, ज्या त्याने २०००मध्ये शारजाह येथे केल्या होत्या.
याव्यतिरिक्त जयसूर्याने १९९६ला कोलंबो येथे नाबाद १२० धावा, १९९७ला मुंबई येथे नाबाद १५१ धावा, २०००ला ढाका येथे १०५ धावा, २००४ला कोलंबो येथे १३० धावा, २००८ला कराची येथे १२५ धावा आणि २००९ला दांबुला येथे १०९ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारे ७ गोलंदाज, केवळ एक आहे भारतीय
कसोटीत कारकिर्दीत कमी वयात ५०० विकेट्सचा टप्पा पार करणारे जगातील अवलिया
आश्चर्यकारक! अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २०पेक्षाही कमी धावांवर सर्वबाद झालेत हे २ संघ
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं तर: यूएई क्रिकेट बोर्ड करणार आयपीएल २०२०चे आयोजन; बीसीसीआयकडून मिळाले अधिकृत पत्र
धोनी इलेव्हन विरुद्ध विराट इलेव्हन कोण कोणावर पडेल भारी? हा खेळाडू म्हणतो…
२०२३ विश्वचषकासाठी आयसीसीने केली सुपर लीग टूर्नामेंट लाँच; भारताव्यतिरिक्त हे संघ करणार क्वालिफाय