आयपीएल 2026 लिलावाचे आयोजन (16 डिसेंबर) रोजी होणार आहे. अबू धाबीमध्ये सर्व 10 संघ लिलावात भाग घेतील. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडे सर्वात मोठी रक्कम उपलब्ध आहे आणि त्या दोन्ही संघांकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.
आयपीएल 2026 लिलावासाठी 359 नावे अंतिम झाली होती, पण आता लिलावाच्या अवघ्या तीन दिवस आधी अचानक 9 खेळाडूंची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. अनेक चाहते सोशल मीडियावर याबद्दल मोठे प्रश्न उपस्थित करत आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या लिलावाच्या आयोजनासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. लिलावासाठी 1355 खेळाडूंनी नोंदणी केली होती आणि बीसीसीआयने अंतिम यादीत 350 नावांचा समावेश केला होता. काही खेळाडूंची नावे यादीत नव्हती, पण नंतर बीसीसीआयने त्यांनाही सामील करून घेतले. त्यांनी स्वास्तिक चिकारा, विरनदीप सिंग, मणिशंकर मुरासिंह, चामा मिलिंद, केएल श्रीजीत, ईथन बॉश, ख्रिस ग्रीन, राहुल राज नमाला आणि विराट सिंग या 9 नवीन खेळाडूंना लिलाव सूचीमध्ये स्थान दिले. एकूण 359 नावे अंतिम झाली होती, पण आता नंतर जोडलेल्या याच 9 खेळाडूंना यादीतून वगळण्यात आले आहे.
आयपीएल लिलावाच्या सुरुवातीच्या 5 सेटवर सर्वांचे लक्ष राहणार आहे. यात कॅमेरून ग्रीन, रवी बिश्नोई, व्यंकटेश अय्यर यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.





