आयपीएल २०२१ च्या ४७ व्या सामन्यात शनिवारी (०२ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्या आमना सामना झाला. यामध्ये राजस्थानने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. असे असले तरीही चेन्नईने सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. प्रथम फलंदाजी करत संघाने १८९ धावा केल्या होत्या आणि यामध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे मोठे योगदान राहिले होते. ऋतुराजने ६० चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. यामध्ये त्याच्या ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
सामना संपल्यानंतर ऋतुराजने त्याच्या दमदार खेळीमागचे रहस्य उलगडले आहे आणि त्याला शेवटी षटकार मारणार याचा विश्वास असल्याचे सांगितले आहे.
सामना संपल्यानंतर ऋतुराज म्हणाला, “सुरुवातीला खेळपट्टी थोडी संथ होती. राजस्थानच्या गोलंदाजांनी पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली. मी योजना बनवली होती की, १३ व्या किंवा १४ व्या षटकापर्यंत फलंदाजी करत राहील, जेणेकरून नंतर त्याचा फायदा घेता येईल. मी फक्त चेंडूला वेळ दिला आणि स्वत:च्या डावावर लक्ष दिले होते. दिवसाच्या शेवटी संघाची धावसंख्या महत्वाची असते. जोपर्यंत तुमचा संघ विजयी होत नसेल, तोपर्यंत तुमची व्यक्तिगत धावसंख्या किती आहे याला काही महत्व नसते. आम्ही पहिल्यांदा १६० धावांपर्यंत पोहोचण्याचा विचार केला होता. नंतर मी विचार केला की १७०, १८० आणि शेवटी आम्हाला १९० मिळाले.”
ऋतुराजने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि त्याचे शतक पूर्ण केले होते. याबाबत तो म्हणाला की, “मी या चेंडूला चांगल्याप्रकारे वेळा दिला होता आणि या स्टेडियमची सीमारेषा फार जवळ आहे. त्यामुळे मला माहित होते की हा एक षटकार असणार आहे. मला चांगली फलंदाजी करण्यावर आणि स्वत:च्या योजनांवर अमल करण्याची गरज आहे.”
ऋतुराजने असे ठोकले शतक
चेन्नईला शेवटचे षटक टाकण्यासाठी राजस्थानचा मुस्तफिजुर रहमान आला होता आणि स्ट्राइकवर रवींद्र जडेजा होता. जडेजाने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर चौकार, षटकार आणि पुन्हा चौकार अशी दमदार खेळी केली. चौथ्या चेंडूवर जडेजाने एक धाव घेत ऋतुराजला स्ट्राइक दिली. ऋतुराजला आता त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी दोन चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती. षटकातील पाचवा चेंडू डाॅट राहिला. पण शेवटच्या चेंडूवर ऋतुराजने आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात लांब षटकार मारला आणि त्याचे शतक पूर्ण केले.
ऋतुराजच्या या शतकानंतर राजस्थानविरुद्ध शतक करणारा सीएसकेचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुरली विजयने २०१० मध्ये आणि २०१८ मध्ये शेन वाॅटसनने हा पराक्रम केला होता. या सामन्यानंतर ऋतुराज हंगातील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने १२ सामन्यात ५०.८० च्या सरासरीने ५०८ धावा केल्या आहेत. तसेच तो हंगामात २० षटकार मारून सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विषय आहे का! आतापर्यंत आयपीएल २०२१मध्ये ४ फलंदाजांनी ठोकलंय शतक, त्यातील तिघे आहेत भारतीय
दे घुमा के… आणि चेंडू स्टेडियमबाहेर! ऋतुराजसह ‘यांनी’ ठोकलेत आयपीएल २०२१मध्ये लांबच लांबच षटकार
पावरप्लेमध्ये जयस्वालचा झंझावात, ताबडतोब अर्धशतक ठोकत रैना-राहुलसारखी कामगिरी करण्यात ‘यशस्वी’