क्रिकेटच्या मैदानावर दररोजच नवनवीन विक्रम खेळाडूंकडून बनविले जातात. त्यातही, काही विक्रम हे हवेहवेसे, तर काही विक्रम नकोसे असतात. आपल्या नावावर नकोसा विक्रम नसावा अशी प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. मात्र, एखादा खराब दिवस असल्यास खेळाडूच नव्हे तर, संपूर्ण संघावर नामुष्की येते. अशीच नामुष्की ५३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच २ जुलै रोजी वेस्ट इंडीज संघावर आली होती. दिग्गजांनी भरलेल्या वेस्ट इंडीज संघाला आयर्लंडकडून अवघ्या २५ धावांवर सर्वबाद व्हावे लागलेले.
झिओन मिल्स येथे खेळला गेलेला, हा सामना केवळ एक दिवसाचा होता. मात्र, दोन्ही संघांना प्रत्येकी दोन डाव खेळण्याची संधी देण्यात येणार होती परंतु, सामना सुरू होण्यापूर्वी असा करार झाला होता की दोन्ही संघांचे डाव पूर्ण न झाल्यास पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेत्याची निवड केली जाईल. वेस्ट इंडीजने त्यांचे व्यवस्थापक क्लाइव वॉलकॉट यांनादेखील प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले होते.
वेस्ट इंडीज संघावर नामुष्की
सन १९६९ मधील वेस्ट इंडिज संघ बऱ्यापैकी मजबूत होता. मात्र, त्यादिवशी त्यांची ही मजबुती काहीही कामी आली नाही. अनपेक्षितपणे संघाला आपल्या पहिल्या डावात केवळ २५ धावांवर सर्वबाद व्हावे लागले. बसिल बुचर यांच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिज संघ आयर्लंड पुढे पूर्णतः हतबल दिसला. वेस्ट इंडीजसाठी सर्वात मोठी भागीदारी अखेरच्या गड्यासाठी ११ धावांची झाली. विशेष म्हणजे वेस्ट इंडीजच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
आयर्लंडचे कर्णधार डग्लस गुडविन यांनी ६ धावा देत ५ तर, ऍलेक रि ऑर्डन यांनी १८ धावा देत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. आयर्लंडची पहिल्या डावात डावात सुरुवात खराब झाली. परंतु, त्यांनी तात्काळ त्यातून सावरत ८ बाद १२५ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. वेस्ट इंडीजने दुसऱ्या डावात दिवसाखेर ४ बाद ७८ धावा बनविल्या. सामन्याआधी ठरल्याप्रमाणे आयर्लंडला सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले. हा सामना कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार खेळला गेला असला तरी, त्याची नोंद अधिकृत सामना म्हणून करण्यात आली नाही.
या संघाच्या नावे आहे सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अधिकृत कसोटी सामन्यात सर्वात कमी धावसंख्येचा नकोसा विक्रम न्यूझीलंड संघाच्या नावे आहे. इंग्लंडने त्यांना १९५५ मध्ये ऑकलंड कसोटीत २६ धावांवर सर्वबाद केले होते. १८९६ मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या कसोटीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा डाव ३० धावांवर गुंडाळलेला. भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या ३६ असून, २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला या धावसंख्येवर सर्वबाद करण्याचा पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
पंतच्या शतकाने सावरला डाव, जडेजाही सेंच्यूरीच्या नजीक; भारताच्या पहिल्या दिवसाखेर ७ बाद ३३८ धावा
इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत पंतची विश्वविक्रमाला गवसणी, बनला जगातील पहिला आणि एकमेव यष्टीरक्षक
अवघ्या चोविसाव्या वर्षी रिषभ पंतने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘हा’ विक्रम, वाचा एका क्लिकवर