बुधवारी (२६ जानेवारी) भारतात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा मंगळवारी भारत सरकारकडून करण्यात आली आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये पद्म पुरस्कारांना गणले जाते. २०२२ वर्षासाठी देखील एकूण १२८ पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ९ मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित झाले आहेत.
साल २०२२ साठी ज्या खेळाडूंना पद्म पुरस्कार मिळणार आहेत, त्यात भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा देखील समावेश आहे. त्याने टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऍथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. नीरजला भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
याशिवाय पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये ४ टोकियो पॅरालिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये दिग्गज भालाफेकपटू देवेंद्र झझारियाचा देखील समावेश आहे. झझारियाला भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म भूषण जाहीर झाला आहे. झझारिया हा पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत भारतासाठी ३ पॅरालिम्पिक पदके जिंकली आहेत. यात २ सुवर्ण आणि १ रौप्य पदकांचा समावेश आहे.
झझारियाव्यतिरिक्त टोकियो पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज अवनी लेखरा, भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुमित अंतिल आणि बॅटमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणारा प्रमोद भगत या पॅरालिम्पिकपटूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर या ९ जणांमध्ये भारताची महिला हॉकीपटू वंदना कटारियाचा देखील समावेश आहे. तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शंकरनारायण मेनन चुंडायिल, मार्शल आर्ट प्रशिक्षक फैसल अली दार, माजी फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवळकर यांना देखील पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येईल. ९३ वर्षीय शंकरनारायण मेनन चुंडायिल मार्शल आर्ट फॉर्म ‘कलारीपयट्टू’ प्रशिक्षक आहेत.
भारत सरकारकडून जाहिर झालेल्या १२८ पद्म पुरस्कारांमध्ये ४ पद्म विभूषण, १७ पद्म भूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
अधिक वाचा – प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरजला दिले जाणार परम विशिष्ट सेवा मेडल, वाचा त्या पदकाबद्दल
नीरजला परम विशिष्ट सेवा मेडल
नीरज भारतीय सैन्यदलात सुभेदार म्हणून कार्यरत आहे. तो ४ राजपूताना रायफल्समध्ये सुभेदारपदी काम पाहातो. सैन्यात असताना त्याने चांगले काम करत विशिष्ट सेवा मेडल जिंकले आहे. यानंतर आता ऑलिंपिकमध्ये अतुलनीय प्रदर्शनासह घवघवीत यश साध्य केल्यानंतर त्याला परम विशिष्ट सेवा मेडल दिले जाणार आहे.
व्हिडिओ पाहा – टोकियो ऑलिम्पिक… भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा
क्रीडा क्षेत्रातील २०२२ वर्षाचे पद्म पुरस्कार विजेते
पद्म भूषण –
– देवेंद्र झझारिया – (पॅरा भेलाफेक)
पद्मश्री
– निरज चोप्रा (भालफेक)
– सुमित अंतिल (पॅरा भालाफेक)
– प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन)
– अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी)
– फैसल अली दार (मार्शल आर्ट)
– शंकरनारायण मेनन चुंडायिल (मार्शल आर्ट)
– ब्रम्हानंद शंकवळकर (फुटबॉल)
महत्त्वाच्या बातम्या –
युवी चाहत्यांसाठी गुड न्यूज! सिक्सरकिंग बनला ‘बाप’माणूस, घरी आला ज्यूनिअर युवराज
“ज्याने कर्नाटकचे नेतृत्व केले नाही त्याला भारताचा कर्णधार केले”