क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू असलेल्या नमन ओझा याच्या वडिलांना म्हणजेच विनय ओझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. या बातमीने क्रिकेटविश्वालाही धक्का बसला आहे. मात्र, कोणत्या कारणामुळे त्यांना ही अटक झाली, चला तर जाणून घेऊया.
का झाली अटक?
खरं तर, पोलिसांनी बँक फसवणूक प्रकरणात विनय ओझा (Vinay Ojha) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) जॉलखेडा शाखेत २०१३मध्ये झालेल्या जवळपास १.२५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा आहे. पोलिसांनी त्यांच्यावर ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कलम ६५,६६अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी इतर आरोपींनाही आधीच अटक केली आहे. असे म्हटले जात आहे की, विनय ओझा दीर्घ काळापासून फरार होते. अटकेनंतर न्यायालयाने विनय ओझा यांना एका दिवसाच्या रिमांडवर पाठवले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, २०१३मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जॉलखेडा शाखेत शाखा प्रमुख अभिषेक रत्नम यांनी फसवणुकीची योजना आखली होती. मात्र, त्याची बदली झाल्यानंतर ओझा आणि इतरांनी मिळून जून २०१३मध्ये जवळपास ३४ बनावट खाते उघडून यावर केसीसी कर्ज हस्तांतरित करत जवळपास सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. ज्यावेळी ही हेराफेरी झाली, त्यावेळी ओझा हे शाखा प्रमुख होते.
यानंतर जवळपास एक वर्षानंतर तत्कालीन शाखा प्रमुख रितेश चतुर्वेदी यांनी २०१४मध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. तक्रारीत सांगितले गेले की, बनावट नावे आणि फोटोंच्या आधारावर शेतकरी क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे.
मुलताई टीआय सुनील लाटा यांनी सांगितले की, विनय ओझाला सोमवारी (दि. ६ जून) अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले आणि एक दिवसाची कोठडी मागितली. न्यायालयाने ओझा यांना चौकशीसाठी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुलगा आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू
विनय ओझा यांचा मुलगा नमन ओझा (Naman Ojha) हा भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १ कसोटी, १ वनडे आणि २ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ११३ आयपीएल सामनेही खेळले आहेत. नमनने कसोटीत ५६ धावा, वनडे सामन्यात १ धाव आणि टी२० मध्ये १२ धावा केल्या आहेत. त्याने ११३ आयपीएल सामन्यात फलंदाजी करताना २०.७२च्या सरासरीने १५५४ धावा चोपल्या आहे. या धावा करताना त्याने ६ अर्धशतकेही चोपली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तुरुंगवासात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंची बिघडली तब्येत, रुग्णालयात करण्यात आले भरती
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?