-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
मुंबई शालेय क्रिकेटमध्ये जाईल्स शिल्ड स्पर्धेचा पूर्वीपासून दबदबा आहे. ते वर्ष होतं १९९३. अंजुमन इस्लामचा एक सलामीचा फलंदाज चांगली फलंदाजी करत ७७ धावांवर पोहोचला. आता हा मोठी खेळी साकारणार असे वाटत असतानाच तो बाद झाला. तो बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परत आला तेव्हा त्याच्या मोठ्या भावाने त्याच्या श्रीमुखात भडकावली. शतक करण्याची चांगली संधी असतानाही बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याची ती शिक्षा होती. त्याच्या बाद होण्याने केंद्रीय विद्यालयाने अंजुमन इस्लामला फॉलोऑन दिला. पहिल्या डावात बाद झाल्याची शिक्षा मिळाल्याने दुसऱ्या डावात बाद व्हायचेच नाही असा निश्चय करत त्याने तब्बल दिड दिवस फलंदाजी करत ४०० धावा केल्या. भावाने दिलेली चपराक त्याला आयुष्यभराचा धडा देणारी ठरली. तो फलंदाज होता वसीम जाफर.
या प्रसंगानंतरही वसीमने शालेय क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या, शतके काढली. तरीही मुंबईच्या १६ वर्षाखालील संघात त्याला संधी मिळेना. निराश होऊन वसीम अनेकदा रडतही असे. मात्र तुझा मार्ग सोपा नाही हे त्याला त्याच्या कुटूंबियांनी समजावले. आपल्या कामगिरीनेच आपण निवड समितीला आपली दखल घेण्यास भाग पाडू शकतो याची जाणीव त्याला करून दिली. त्यावेळी मुंबईच्या १६ वर्षाखालील संघनिवडीकरता ‘षटकार करंडक’ ह्या स्पर्धेवर निवड समितीचे लक्ष असे. वसीमने षटकार करंडकात नाबाद २०६ धावांची खेळी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. ह्याला याहून अधिक काळ मुंबईच्या संघातून बाहेर ठेवणे योग्य नाही हे जाणून अखेरीस मुंबईच्या १६ वर्षाखालील संघात त्याचा समावेश करण्यात आला.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने वसीमकडे तोपर्यंत स्वतःचे क्रिकेट किटदेखील नव्हते. शाळेकडून खेळताना शाळेने पुरवलेले पॅड्स, ग्लोव्ह्ज, बॅट घेऊन तो खेळत असे. मुंबईकडून खेळू लागल्यावर मात्र त्याला प्रायोजक मिळाले. दरम्यान मुंबईतल्या नॅशनल क्रिकेट क्लबनेही वसीमला आपल्या संघातून खेळण्याची संधी दिली. नॅशनलकडून खेळताना क्लब पातळीवरही वसीमने पोत्याने धावा केल्या. नॅशनलने तेव्हा सलग सहा वेळा कांगा लीगचे विजेतेपद मिळवले होते. वसीमबाबत त्यावेळी मुंबईच्या मैदान वर्तुळात वदंता असे,
“पहिल्या २० मिनिटांत जाफरला बाद केले तर ठीक. अन्यथा संपूर्ण दिवस तो तुम्हाला चेंडूमागे पळवतो.”
वसीमच्या १६ आणि १९ वर्षाखालील संघांसाठीच्या कामगिरीने लवकरच त्याची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली. आपल्या पहिल्या सामन्यात वसीम ११ धावा करून बाद झाला. पुढच्या सामन्यात संजय मांजरेकरच्या अनुपस्थितीत सलामीला येत नाबाद त्रिशतक फटकावत त्याने आपली प्रतिभा दाखवून दिली. त्यावेळी रणजीमध्ये त्रिशतक करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. ही खेळी करताना त्याने सुलक्षण कुलकर्णीबरोबर पहिल्या गड्यासाठी ४५९ धावांची भागीदारी केली. पहिल्या गड्यासाठी ४०० किंवा त्याहून धावांची भागीदारी होण्याची ती पहिलीच वेळ होती. या सबंध हंगामात वसीमने ७ सामन्यांत ११५ सरासरीने ६९२ धावा काढल्या.
भारतीय संघाच्या १९९९-२००० च्या अपयशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर संघात अनेक बदल करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून वसीमला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात वसीमला अॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉक यांच्यासारख्या भेदक गोलंदाजांचा सामना करावा लागला. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ धावा करून वसीम बाद झाला. साहजिकच त्याला त्या मालिकेनंतर संघातून बाहेर बसावे लागले. कसोटीमध्ये पुढची संधी मिळण्याकरता वसीमला जवळपास दोन वर्षे वाट पहावी लागली.
दरम्यानच्या काळात देशांतर्गत स्पर्धांमध्ये वसीम भरपूर धावा काढत राहिला. मे २००२ मध्ये झालेला वेस्ट इंडिज दौरा आणि त्यानंतर लगेचच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात वसीम भारताकडून खेळला. फारशी चांगली कामगिरी करता न आल्याने इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला संघातून बाहेर बसवले गेले.
मार्च २००६ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्धच्या मालिकेसाठी वसीमला पुन्हा एकदा भारताकडून संधी मिळाली. यावेळी मात्र संधीचा पुरेपूर फायदा घेत वसीमने शतक झळकावले. त्यानंतर लगेचच जून २००६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आपले पहिले द्विशतकही ठोकले. जवळपास दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर वसीमचा फॉर्म हरपला आणि त्याला भारतीय संघातून बाहेर पडावे लागले. दरम्यान गौतम गंभीरने भारतीय कसोटी संघात सेहवागचा साथीदार म्हणून आपले स्थान पक्के करत वसीमचे पुनरागमन लांबणीवर पाडले. भारताकडून खेळलेल्या ३१ कसोटी सामन्यांत ५ शतके आणि ११ अर्धशतके काढत वसीमने १९४४ धावा केल्या.
भारताकडून सतत दुर्लक्ष होऊनही निराश न होता वसीम मुंबईकडून खेळत राहिला. त्याच्या कर्णधापदाखाली मुंबईने २००८-०९ आणि २००९-१० अशा सलग दोन हंगामांत रणजी करंडक जिंकला. या दोन्ही हंगामात वसीमने अनुक्रमे १२६०आणि ६३८ धावा केल्या. कधीतरी आपल्याला भारतीय संघातून संधी मिळेल या आशेवर वसीम धावा काढत राहिला.रणजीच्या २०१० ते २०१४ ह्या हंगामांमध्ये वसीमने अनुक्रमे ७२८,४०६, ८३५, ५८२ धावा काढल्या. मात्र भारतीय संघात पुनरागमनाचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मुंबईकडून खेळलेल्या १८ हंगामात फक्त ५ हंगामात वसीमची सरासरी ५० किंवा त्यापेक्षा जास्त जाऊ शकली नाही. या ५ पैकी ३ वेळेस त्याची सरासरी ४५ च्या आसपास होती. असे असूनही त्याच्याकडे निवड समितीचे लक्ष गेले नाही.
जवळपास १९ वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर वसीमने २०१५-१६ पासून विदर्भाकडून खेळण्याचे ठरवले. विदर्भाकडून खेळताना नव्या खेळाडूंना आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा वसीमने करून दिला. गेल्या वर्षी विदर्भाने पहिल्यांदाच रणजीचे विजेतेपद मिळवले. या विजयात वसीमचा मोठा वाटा आहे. वसीमबद्दल एक गोष्ट नमूद केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. विदर्भाकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या हंगामात दुखापतीमुळे वसीम काही सामने खेळू शकला नाही. विदर्भ क्रिकेट संघटनेने तरीही वसीमला त्याच्या कराराची पूर्ण रक्कम अदा केली. वसीमने हे लक्षात ठेवले. विदर्भ क्रिकेट संघटनेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पुढचा संपूर्ण हंगाम वसीमने एक रुपयाही न घेता खेळला.
आजवरच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत वसीमने तब्बल नऊ वेळेस रणजी करंडक जिंकला आहे. आठवेळेस मुंबईकडून आणि नवव्यांदा विदर्भाकडून. त्याने मुंबई सोडून विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो रणजीचा अजून एक अंतिम सामना खेळेल असं कुणी म्हटलं असतं तर विश्वास बसला नसता. त्याने मात्र ते खरे करून दाखवत नुसता अंतिम सामनाच न खेळता तो जिंकूनही दाखवला. आजही वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याची धावांची भूक संपलेली नाही. परवा दुलिप करंडकात त्याने सलग सहा अर्धशतके करण्याच्या गुंडप्पा विश्वनाथ यांच्या विक्रमाशी बरोबरी करत शतकही ठोकले. सध्या सुरु असलेल्या रणजी करंडकात आपला पूर्वीचा संघ मुंबईविरुद्धही त्याने शतक ठोकले. ज्या मुंबईच्या संघाने त्याला खेळविण्यास नकार दिला त्याच मुंबईच्या संघाविरुद्ध शतक ठोकत त्यांचा डावाने पराभव करण्यात वसीमने मोठी भूमिका बजावली. त्याच्या महिनाभर आधी रणजीमध्ये ११००० धावा करणारा पहिला फलंदाज बनण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.
कसोटी क्रिकेटचा शिक्का बसलेला वसीम आयपीएलसुद्धा खेळला सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून पहिले दोन हंगाम खेळताना त्याने ८ सामन्यांत १३० धावा काढल्या. वसीम हा अर्थात टी-२० क्रिकेटचा खेळाडू नव्हताच. त्यामुळे त्यानंतर कधीही तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही.
वसीममध्ये असलेली गुणवत्ता पाहता खरं तर त्याने भारताकडून किमान १०० कसोटी सामने खेळायला हवे होते. त्याची गाडी मात्र ३१ कसोटींवरच अडकली. सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली आणि सेहवागसारखे खेळाडू असताना बऱ्याचदा संघात असूनही त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळालीच नाही. जाफरच्या फलंदाजीत, धावा घेणाच्या पद्धतीत, मैदानावरच्या वावरण्यात एक प्रकारची शिथिलता असे. क्षेत्ररक्षणाचे महत्व वाढलेल्या आजकालच्या जमान्यात त्यामुळेच की काय बहुधा त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. वसीमकडे गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही तो फक्त एक महान रणजीपटू म्हणूनच ओळखला जाईल हे त्याचे सुदैव म्हणायचे की दुर्दैव हा प्रश्न मनामध्ये घर करत राहतो.
वसीमची कारकीर्द
कसोटी
सामने ३१ धावा १९४४
प्रथम श्रेणी
सामने २४९ धावा १८७७५
शतके ५६ अर्धशतके ८७