इंडियन सुपर लीग 2022-23 ( आयएसएल) मध्ये आज यजमान जमशेदपूर एफसीने उल्लेखनीय खेळ केला. सलग सात पराभवानंतर जमशेदपूर एफसीचे मनोबल खचलेले दिसेल असे वाटले होते, परंतु एफसी गोवाला अनपेक्षित धक्का बसला. जमशेदपूरने सर्व आघाड्यांवर कौतुकास्पद खेळ करताना एफसी गोवाची विजयी घोडदौड रोखली. पण, एवढा सुरेख खेळ करूनही जमशेदपूरला अखेरच्या मिनिटाला बरोबरीवर समाधान मानावे लागले. इकर गौरोत्स्केना आजच्या सामन्यातील स्टार ठरला. 31व्या मिनिटाला गौरोत्स्केनाच्या स्वयंगोलने जमशेदपूरला आघाडी मिळवून दिली, परंतु त्यानेच एफसी गोवा साठी ही लढत बरोबरी सोडवली. त्याच्या दोन गोलने जमशेदपूरचा यंदाच्या पर्वातील दुसरा विजय हिस्कावून घेतला. जमशेदपूर साठी इशान पंडिताने दुसरा गोल केला.
आयएसएलच्या मागील पर्वातील लीग शिल्ड विजेत्या जमशेदपूर एफसीची यंदा अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. मागील 7 सामन्यांत त्यांना हार मानावी लागली आहे आणि आता उर्वरित सामन्यांत विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या जमशेदपूरने घरच्या मैदानावर सुरूवात चांगली केली. पहिल्या 30 मिनिटांत त्यांनी 3 ऑन टार्गेट प्रयत्न केले आणि त्यापैकी एकवर गोल मिळाला. 31व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेला चेंडू वाचवण्याच्या प्रयत्नात इकर गौरोत्स्केनाने हेडरद्वारे चेंडू स्वतःच्या गोलजाळीत पाठवला अन् जमशेदपूरला 1-0 अशी आघाडी मिळवली. 36व्या मिनिटाला चिमा चूक्वूने सोपी संधी गमावली. जमशेदपूरला 2-0 अशी आघाडी घेता आली असती.
इकर गौरोत्स्केनाने चूक सुधारताना 38व्या मिनिटाला एफसी गोवाला बरोबरी मिळवून दिली. मकान छोटेच्या पासवर गौरोत्स्केनाने हेडरद्वारे गोल केला अन् जमशेदपूरचा गोलरक्षक विशाल यादव याला तो रोखता आला नाही. या गोलनंतर इकर गौरोत्स्केनाच्या चेहऱ्यावर झालेल्या चुकीच्या सुधारणेचा आनंद होता आणि त्याने सेलिब्रेशनही जोरदार केले. पहिल्या हाफ मध्ये जमशेदपूरचा खेळ वरचढ ठरला. मध्यंतरानंतर गोवाने तिसऱ्याच मिनिटे सलग दोन कॉर्नर मिळवले, परंतु त्याचा फार काही फायदा त्यांना उचलता आला नाही. पण, 50व्या मिनिटाला जमशेदपूर एफसीने आघाडी डबल केली. एफसी गोवाच्या बचावपटूने चेंडू गोलरक्षक धीरजकडे पास केला, परंतु तेवढ्यात इशान पंडिता आला अन् त्याने धीरजच्या पायाखालून चेंडू स्वतःकडे घेतला. धीरज गोलपोस्ट सोडून बराच पुढे आला होता अन् पंडिताला सहज गोल करता आला.
A draw in Jamshedpur.#ForcaGoa #UzzoOnceAgain #JFCFCG #HeroISL pic.twitter.com/jLmTA36i4M
— FC Goa (@FCGoaOfficial) December 22, 2022
गोवा संघाच्या खेळाडूंकडे हा गोल होताना बघण्यापलीकडे काहीच पर्याय राहिला नाही. 54व्या मिनिटाला ब्रँडन फर्नांडेसला पेनल्टी क्षेत्रात बॉरिस सिंगने पाडले, परंतु हा फाऊल खूपच सौम्य होता आणि त्यामुळे एफसी गोवाला पेनल्टी रेफरीने दिली नाही. गोवाचे खेळाडू पेनल्टीची मागणी करताना दिसले. पुढच्या मिनिटाला जमशेदपूरच्या खेळाडूंनी सुरेख काऊंटर अटॅक केला, परंतु बॉरिसला गोल करता नाही आला. गोवा कडून आता पुन्हा बरोबरी घेण्याचे जोरदार प्रयत्न होताना दिसले. जमशेदपूरचा बचावही तितकाच तगडा राहिला. एडू बेडिया, इकर, ब्रिसन फर्नांडेस हे सातत्याने जमशेदपूरच्या बचावपटूंना व्यग्र ठेवून होते. जमशेदपूरच्या पेनल्टी क्षेत्रावरील त्यांचे आक्रमण अधिक तीव्र झालेले दिसले. 78व्या मिनिटाला जमशेदपूरकडून पलटवार झाला. चिमा चुक्वू व पंडिता या जोडीने गोवाच्या पेनल्टी खळबळ माजवली. पंडिताचा ऑन टार्गेट प्रयत्न धीरजने रोखला अन्यथा जमशेदपूरचा तिसरा गोल झालाच होता.
89व्या मिनिटाला एफसी गोवाने बरोबरीचा गोल अखेर केला. इकर गौरोत्स्केनाने दुसरा गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. याहीवेळेस गोलरक्षक विशाल यादव काहीच करू शकला नाही. या गोलनंतर जमशेपूरच्या ताफ्यात एकप्रकारे दबाव वाढलेले दिसले आणि त्याचाच फायदा गोवा उचलण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण, त्यांच्याकडून विजयी गोल झाला नाही आणि सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. जमशेदपूरने पराभवाची मालिका खंडित केली आणि हिच त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट ठरली.
निकाल: एफसी गोवा 2 (इकर गौरोत्स्केना 38 मि. व 89 मि.) बरोबरी वि. जमशेदपूर एफसी 2 (इकर गौरोत्स्केना 31 मि. (स्वयंगोल), इशान पंडिता 50 मि.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अठरा वर्षे आणि अनेक रेकॉर्ड्स! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव का बाहेर झाला? उमेश यादवने सांगितले कारण