बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमधील सोमवारचा (२७ डिसेंबर) दुसरा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये खेळला गेला. जयपूर पिंक पँथर्स व युपी योद्धा या संघामध्ये झालेला सामना काहीसा संथ मात्र उत्कंठावर्धक ठरला. दोन्ही संघांनी संयम व आक्रमणाचा सुरेख मेळ साधला. शेवटचा रेडवर गेलेल्या या सामन्यात जयपूरचा कर्णधार दीपकने दोन गुण मिळवले. यासह जयपूर संघाने ३२-२९ अशा गुणफरकाने सामना आपल्या नावे केला.
परदीप नरवाल विरुद्ध दीपक निवास हूडा या दोन वरिष्ठ खेळाडूंवर या सामन्यात लक्ष होते. मात्र, जयपूरच्या संघाने परदीपला पहिल्या हाफमध्ये बराच वेळ बाहेर ठेवले. पहिल्या हाफच्या अखेरीस जयपुर संघाकडे ७ गुणांची आघाडी होती.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी चमकदार खेळ दाखवला. पहिल्या हाफप्रमाणे जयपूर संघाने परदीपला शांत ठेवले. जयपूरसाठी अर्जुन देशवाल याने रेडर म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली. जयपूरचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. परदीप नरवालचे अपयश यूपी संघासाठी निराशाजनक ठरले.