इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. बेंगलोरने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यातील 4 सामन्यात त्यांना विजय, तर 4 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. संघातील वरच्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांना सोडलं, तर खालच्या फळीत कोणताही खेळाडू मोठी खेळी करताना दिसत नाहीये. त्यात दिनेश कार्तिक याच्या नावाचाही समावेश आहे. त्याच्याकडून संघाला खूपच अपेक्षा आहेत, पण त्याने 8 सामन्यात फक्त 83 धावा केल्या आहेत. अशात कार्तिकने आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडू, सार्वकालीन सर्वोत्तम खेळाडू, आवडता क्षण या गोष्टींबाबत सांगितले आहे.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने जिओ सिनेमावर बोलताना या सर्व गोष्टींबाबत सांगितले. त्याने आयपीएलमधील सार्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणून महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याची निवड केली. याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमधील आवडता क्षण मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल जिंकणे सांगितले. कार्तिक 2012 आणि 2013 आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याने 2013मध्ये चॅम्पियन बनलेल्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक याने आयपीएलमधील सार्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू निवडताना शेन वॉटसन किंवा सुनील नारायण अशी नावे घेतली. तसेच, आयपीएलमधील सर्वात दुर्लक्षित खेळाडूचे नाव सांगताना त्याने पंजाब किंग्सच्या शॉन मार्श याचे नाव घेतले. याव्यतिरिक्त त्याने आयपीएलच्या भविष्यातील कोणत्या खेळाडूंवर लक्ष राहील, याबाबत सांगताना यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा आणि साई सुदर्शन यांची नावे घेतली. हे तिन्ही खेळाडू आयपीएल 2023 स्पर्धेतही चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
दिनेश कार्तिकचे प्रदर्शन
बुधवारी (दि. 26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध दिनेश कार्तिक खास प्रदर्शन करू शकला नाही. त्याने या सामन्यात 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 18 चेंडूत 22 धावा केल्या. यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. कार्तिकच्या या कामगिरीवर जोरदार टीकाही करण्यात आली. चाहत्यांनी अशीही मागणी केली की, कार्तिकला संघातून बाहेर बसवले पाहिजे. आता पुढील सामन्यात कार्तिकबाबत संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Wicketkeeper Batsman Dinesh Karthik picks his favorite of IPL know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला विरोधी संघाकडूनही मिळतोय तुफान पाठिंबा; राजस्थानचा खेळाडू म्हणाला, ‘आता तो मैदानात असूनही…’
ICC T20 Rankings: ‘टॉपर’ सूर्यकुमारच्या जागेला धोका, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची दुसऱ्या स्थानी झेप