संपूर्ण भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या कठीण परिस्थितीत सर्वच क्षेत्रांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. क्रिकेटमध्ये देखील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व ब्रेट ली यांनी भारताला आर्थिक निधी देवून मदत केली आहे. तर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 1 कोटींची मदत केली होती. तयाशिवाय इतर भारतीय खेळाडूंनी देखील आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे. यातच आता भर पडली असून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने देखील भारताला कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने युनिसेफच्या कोविड -19 रिलीफ फंड मध्ये 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ 28 लाख 64 हजार रुपये दान केले आहेत. ही सर्व रक्कम कोरोनाविरुद्ध लढ्यात म्हणजेच कोरोनाची टेस्ट करण्यासाठी तसेच ऑक्सिजन साठी वापरण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने खेळाडूं सोबतच सामान्य नागरिकांना देखील युनिसेफच्या कोविड रिलीफ फंट मध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निक हॉकले म्हणाले की, “भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये फार जवळचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. क्रिकेटचे असणारे संबंधच आमच्या मैत्रीसाठी महत्त्वाचे केंद्रस्थान आहेत. पॅट कमिन्स व ब्रेट ली यांनी केलेल्या मदतीने आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळाली. यामुळेच आम्हाला युनेस्कोच्या मदतीने कोरोना विरुद्धच्या लढाईत फंड जमण्यास आनंद होत आहे.”
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात ऑक्सिजनची सध्या नितांत गरज भासत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांची योग्य संख्या समोर येण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणे देखील अनिवार्य झाले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची देखील आवश्यकता आहे. ऑक्सिजनच्या अभावे अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळे सरकारने देखील याबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे. अशातच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या मदतीने भारताला नक्कीच फायदा होणार आहे. यापूर्वीदेखील ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स सोबतच ब्रेट ली याने देखील 42 लाख रुपयांची मदत केली होती.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2021 : बाद फेरीत स्थान मिळवण्याची चुरस वाढली, पाहा कोणते संघ पक्की करणार आपली जागा