२०११ चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकेपर्यत भारतीय संघ कायम ‘फेवरेट’ म्हणूनच सहभागी होत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली अनपेक्षितपणे १९८३ विश्वचषक जिंकल्यावरनंतर विजेतेपदाचा जो दुष्काळ पडला तो २०११ ला घरच्या मैदानावर संपला. परंतु, दरम्यानच्या काळात एक गोष्ट सातत्याने होत होती आणि सर्व भारतीयांसाठी विश्वचषकात आनंद साजरा करण्याची पर्वणी देखील आणि ती म्हणजे सलग चार विश्वचषकात पाकिस्तानवर दणदणीत विजय!
त्या चार विजयांपैकी आज आम्ही १९९९ च्या विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामन्यातील काही न ऐकलेल्या घटना तुमच्यासाठी घेऊन आलोय.
विश्वचषकाची घरवापसी-
पहिल्या तीन विश्वचषकांचे आयोजन केल्यानंतर भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया आणि पुन्हा भारतीय उपखंड अशी परिक्रमा करत सतरा वर्षांनी विश्वचषक पुन्हा आपल्या जन्मदात्या देशात परतला. श्रीलंका विश्वविजेता तर भारत, ऑस्ट्रेलिया व यजमान इंग्लंड नेहमीप्रमाणे संभाव्य विजेते म्हणून सहभागी झाले. बदललेल्या प्रारूपानुसार बारा संघ दोन गटात विभागून त्यातील अव्वल तीन संघ ‘सुपर सिक्स’ मध्ये भिडणार होते.
युद्धजन्य परिस्थितीत सामना-
१९९९च्या मे महिन्यात पाकिस्तानी सेना व आतंकवाद्यांनी काश्मीरमधील ‘कारगिल’ येथे घुसखोरी करत काही भाग बळकावला आणि युद्धाची ठिणगी पडली. इकडे ठरलेल्या कार्यक्रमानुसार ८ जूनला युद्धभूमीवरील हे दोन देश क्रिकेटच्या मैदानात भिडणार होते. क्रिकेट वेड्या दोन्ही देशांत जबरदस्त वातावरण निर्मिती झाली होती.
अगदी, सामन्याच्या ठिकाणी बाहेर गेटवर दोन पाकीस्तानी प्रेक्षकांना हुसकावून लावले होते. त्या दोघांनी, “कारगिल और वर्ल्डकप हमारा है। ” असे पोस्टर झळकावले होते. एकूणच परिस्थिती खूप तणावपूर्ण झाली होती.
गांगुलीची माघार-
“प्रिन्स ऑफ कोलकाता” सौरव गांगुली त्या विश्वचषकात भलताच फॉर्ममध्ये होता. सहा सामन्यात ३५० धावा ठोकत विश्वचषक गाजवत होता. पण अचानक, सामन्याच्या आदल्या दिवशी गांगुली पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही अशी बातमी आली. भारतीय क्रिकेटप्रेमी नाराज झाले परंतु पाकिस्तानी मिडीयाला आयते कोलित मिळाले.
“शोएब अख्तरला घाबरून गांगुलीची माघार”
“शोएब अख्तरला घाबरून गांगुलीची माघार” अशी ठळक हेडलाईन पाकिस्तानी वृत्तपत्रांनी छापली तसेच दुरदर्शनवर सुद्धा हाच चर्चेचा विषय ठेवला गेला. तेव्हा खरतर झालं असं की, सरावा दरम्यान गांगुलीला दुखापत झाली होती आणि लवकर बरी होण्याच्या प्रकारातील दुखापत नसल्याने व्यवस्थापनाने गांगुली खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
८ जून १९९९,मॅनचेस्टर
तिकडे शेकडो मैलावर दोन्ही देशांचे सैन्य भिडले होते आणि मॅनचेस्टरमध्ये आल्हाददायक वातावरणात दोन्ही संघ मैदानावर उतरले. विक्रमी तिसऱ्यांदा मोहम्मद अझरुद्दीन भारताचे विश्वचषकात नेतृत्व करत होता तर पाकिस्तानचा कर्णधार तेज गोलंदाज वसिम अक्रम नव्याने मिळालेली जबाबदारी समर्थपणे वाहण्यात आतापर्यंत यशस्वी झाला होता.
अझरुद्दीनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. गांगुलीच्या जागी निवडलेला सदागोपन रमेश हा सचिन तेंडुलकर सोबत सलामीला उतरला. भारतीय संघ तिशीपार करताच अब्दुल रज्जाकने रमेशला त्रिफळाचीत केले. सचिनला साथ करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागा बनविण्याच्या प्रयत्नात परंतु विश्वचषकात फॉर्ममध्ये असेलेला राहुल द्रविड आला.
एकेरी-दुहेरी आणि मिळेल तेव्हा चौकार वसूल करत दोघांनी धावफलक हलता ठेवला. संघाचे शतक दृष्टीक्षेपात होते. सचिन आज हमखास शतक करणार असे वाटत असतानाच, अझर मेहमूदने वैयक्तिक ४५ धावांवर त्याला सकलेन मुश्ताकच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. ओल्ड ट्रॅफोर्डवर पाकिस्तानी खेळाडू आणि प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला तर भारतीय चाहत्यांचे चेहरे हिरमुसले.
पाकिस्तानच्या संसदेत घेतले सचिनचे नाव-
तिकडे पाकिस्तानच्या संसदेत कारगिल युद्धाच्या मुद्दयांवर गरमागरम चर्चा सुरू होती. जेव्हा सचिन तेंडुलकर बाद झाला तेव्हा तत्कालीन पाकिस्तानी सुचना व प्रसारण मंत्री परवेझ राशिद यांनी भर संसदेत सचिन बाद झाल्याची घोषणा केली. या बातमीचा परिणाम असा झाला की, तणावाच्या वादळात आनंदाची झुळूक वाहिली.
इकडे सचिन तंबूत परतल्याने पाकीस्तानचा आत्मविश्वास वाढला. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला उप-कर्णधार अजय जडेजा स्वस्तात परतला. पुढे, द्रविडच्या साथीला कर्णधार अझरुद्दीन आला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली.नियमीत अंतराने विकेट गेल्याने, अक्रम आणि अझहर मेहमूदच्या कंजूस गोलंदाजीमुळे भारताची धावसंख्या २२७ इतकीच मर्यादित राहिली. द्रविडने सर्वात जास्त ६१ धावा केल्या. पुढे जाऊन, राहुल द्रविडच १९९९ च्या विश्वचषकात सर्वाधिक (४६१) धावा करणारा फलंदाज ठरला.
प्रत्युत्तरादाखल झालेली पाकीस्तानची सलामीची जोडी जवागल श्रीनाथने फोडली. ३७ चेंडूत शतक फटकावून प्रसिद्ध झालेला शाहिद आफ्रिदी सहा धावा काढून परतला. नियमित अंतरात गडी बाद करत भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पाकिस्तान कडून सईद अन्वर (३६) व इंजमाम उल हक (४१) हेच थोडाफार प्रतिकार करू शकले. पाकीस्तानचा संपूर्ण संघ फक्त १८० धावांपर्यंत मजल मारु शकला आणि भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकात धूळ चारली.
या सामन्यात, कर्नाटकसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंनी चमक दाखवली. सर्वोच्च धावा राहुल द्रविडने केल्या तर, पाकिस्तानचे दहा बळी वेंकटेश प्रसाद (५ बळी), जवागल श्रीनाथ (३ बळी) व अनिल कुंबळे (२ बळी) यांनी वाटून घेतले.
विसराळू डेविड शेपर्ड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू व प्रेक्षकांचे आवडते पंच म्हणून डेविड शेपर्ड ओळखले जातात. परंतु, १९९९ च्या विश्वचषकातील भारत-पाकीस्तान सामन्यात त्यांच्याकडून अनावधानाने एक चूक झाली. पाकिस्तानच्या डावातील ३१ वे षटक अनिल कुंबळे टाकत असताना चाहत्यांच्या गोंगाटामुळे शेपर्ड यांना षटक संपल्याचे समजले नाही आणि कुंबळे अजून एक चेंडू टाकून गेला. स्क्रीनवर सात चेंडू दिसल्यावर शेपर्ड हे फक्त त्याच्या खास शैलीत हसले. त्या एक अधिकच्या चेंडूने भारताच्या विजयाचे अंतर फक्त इंजमामच्या एका धावेने कमी झाले.
हा विजय मिळवून देखील भारत उपांत्य फेरी गाठू शकला नाही मात्र पाकिस्तान त्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला परंतु, ऑस्ट्रेलियाने त्यांना हरवत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. त्यादिवशी त्या पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी झळकावले, “कारगिल और वर्ल्डकप दोनो हमारा है” हे फलक पुन्हा झळकले. फरक इतकाच होता की, यावेळी ते भारतीय प्रेक्षकांच्या हाती होते.