fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जेव्हा १०व्या व ११व्या क्रमांकाच्या गोलंदाजांनी फलंदाजीत केला होता कहर

When Chandu Sarwate and Shute Banerjee added 249 for the last wicket against Surrey at The Oval

क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंड देशात एकापेक्षा एक सरस अशा क्रिकेटपटूंची कमतरता नाही. याच रांगेतील एक नाव म्हणजे सर ऍलेक बेडसर (Alec Bedser). फक्त ५१ कसोटी सामन्यात २३६ बळी आणि ४८५ प्रथमश्रेणी सामन्यात १,९२४ बळी ही कामगिरी पाहून अवाक होणे यापलिकडे आपण काहीच करू शकत नाही. सर बेडसर यांना २०व्या शतकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूपैकी मानले जाते ते काही उगीच नाही. परंतु, प्रत्येक शेरास सव्वाशेर भेटतो तसे सर बेडसर यांना एक नव्हे तर दोन सव्वाशेर भेटले ते सुद्धा भारतीय. एक मराठमोळे चंदू सरवटे (Chandu Sarwate) आणि बंगाली बाबू सरोदिंदू नाथ बॅनर्जी उर्फ ‘शूट’ बॅनर्जी (Shute Banerjee).

१९४६ चा दौरा –

इंग्रज जेथे गेले तिथे क्रिकेट घेऊन गेले. भारतात क्रिकेट प्रचंड पसंत केले जाऊ लागले. महाराजा रणजितसिंग, सी के नायडू, दुलिपसिंह या खेळाडूंनी इंग्लंडमध्ये नाव कमावले होते. भारताची पुढील पिढी देखील प्रतिभावंत होती. १९४६ चा दौरा हा पारतंत्र्यातील भारताचा अखेरचा दौरा ठरणार होता कारण, स्वातंत्र्यासंबंधीच्या वाटाघाटींनी जोर पकडला होता आणि भारत लवकरच स्वतंत्र होणार होता. त्याच अनुषंगाने, हा दौरा करण्यासाठी भारतीय संघाने राणीच्या इंग्लंड देशात पाय ठेवला.

नवाब इफ्तिखार अली खान पतौडी (Nawab Iftikhaar Ali Khan Pataudi) भारतीय संघाचे नेतृत्व करणार होते. संपूर्ण दौऱ्यात ३२ सामने होणार होते. त्यापैकी २९ हे स्थानिक कौंटी संघांसोबत तर ३ सामने हे इंग्लंडच्या राष्ट्रीय संघांसोबत. भारतीय संघासाठी इतके सामने म्हणजे एकप्रकारे मेजवानी होती. दौऱ्याची सुरूवात जरा निराशाजनक झाली. पहिला प्रथमश्रेणी सामना अवघ्या सोळा धावांनी गमवावा लागला तर दुसरा सामना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी विरुद्ध बरोबरीत सुटला. तिसरा सामना हा सरे (Surrey) कौंटी संघांसोबत ओव्हलच्या मैदानावर होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ओव्हलच्या मैदानाचे अतोनात नुकसान झाले होते. जाणकारांनी सांगितले होते की, हे मैदान १९४८ पर्यंत पूर्ववत होणे अवघड होते परंतु मैदानाच्या कर्मचार्यांनी मेहनतीने मैदान खेळण्यासाठी योग्य बनवले.

अविस्मरणीय सामना

११ मे १९४६ चा दिवस उजाडला. सुरवातीच्या दोन सामन्यात समाधानकारक कामगिरी करत भारतीय संघ आत्मविश्वास मिळवत होता. परंतु, अचानक सकाळी सकाळी अणुबॉम्ब पडावे तसे कर्णधार पतौडी आणि अनुभवी लाला अमरनाथ यांनी तो सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार पदाची जबाबदारी विजय मर्चंट यांच्यावर आली. समोरच्या सरे संघात बेडसर व आल्फ गोवरही इंग्लडची राष्ट्रीय संघातील वेगवान दुकली तर लॉरेन्स फिशलॉक सारखा फलंदाज होता. एकूणच सरे संघाचे पारडे जड झाले होते.

नाणेफेकीसाठी विजय मर्चंट व नायजेल बेनेट त्यावेळी विजय हजारे यांनी सुंदर खेळपट्टी असे वर्णन केलेल्या, ओव्हल मैदानावर आले. मर्चंट यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ओव्हलच्या त्या मैदानावर हजारे व मर्चंट सलामीवीर म्हणून उतरले. हजारे आणि पाठोपाठ रूसी मोदी शून्यावर तंबूत परतले. बेडसरने अपेक्षेप्रमाणे आग ओकायला सुरूवात केली होती. मर्चंट आणि गुल मोहंमद यांनी डाव सावरत १११ धावांची भागीदारी केली. परंतु मर्चंट वैयक्तिक ५३ आणि मोहंमद ८९ धावांवर बाद होताच पुन्हा ” येरे माझ्या मागल्या… ” अशी परिस्थिती झाली. बेडसरचा स्विंग आणि वेग यांना झेलणे कोणालाही जमत नव्हते आणि आपला पाचवा बळी घेत बेडसरने भारताची अवस्था २०५-९ अशी करून ठेवली. भारताचा अखेरचा खेळाडू म्हणून शूट बॅनर्जी मैदानात दाखल झाले.
चंदू सरवटे एका मुलाखतीत म्हटले होते, ” जेव्हा बॅनर्जी मैदानावर आला तेव्हा सरेच्या कर्णधारला वाटले यांना आपण काही मिनीटात बाद करू आणि त्याने ग्राऊंडस्मनला रोलर तयार ठेवायला सांगितला.”

ऐतिहासिक भागीदारी

तसे पहायला गेले तर सरवटे आणि बॅनर्जी दोघेही चांगले अष्टपैलू खेळाडू होते. दोघांच्या नावे दोन-दोन प्रथम श्रेणी शतके होती. सरवटे हे होळकर संस्थानासाठी तर बॅनर्जी हे बिहारसाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी करत. याचबरोबर या दोघांनी एकत्रित ईस्ट झोनसाठी सलामीला फलंदाजी केली होती.

बेनेट आणि सरेचे अन्य खेळाडू फलंदाजीसाठी तयार होते परंतु या जोडीच्या मनात वेगळेच काही सुरु होते. हळूहळू दोघांनी वेग पकडला. त्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सरवटे नाबाद १०२ तर बॅनर्जी ८७ धावांवर नाबाद होते. सरेचा संघ पूर्णपणे अचंबित होता तर भारतीय संघ या जोडीच्या कामगिरीवर एकदम खूश. फक्त दोन तासात १९६ धावांची भागीदारी या दोघांनी केली होती. सरेचा संघ यष्टिरक्षक जेराल्ड मोबीला शिव्या घालत होता कारण, त्याने जॅक पार्करच्या गोलंदाजीवर सरवटेंना यष्टीचीत करण्याची सोपी संधी दवडली होती.

त्यावेळी दुसरा दिवस हा रविवार असल्याने विश्रांतीचा होता. १३ मे ला सरवटे आणि बॅनर्जी मैदानावर उतरले आणि काही वेळातच बॅनर्जी यांनी आपले शतक साजरे केले. तेव्हाच्या ओव्हलच्या तुटक्या खुर्च्यांवर गर्दी होऊ लागली होती. या जोडीने १० व्या विकेटसाठी इंग्लंडमधील सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला, जो त्याआधी फ्रॅन्क वुली व अल्बर्ट फिल्डर (२३५ धावा) यांच्या नावे होता. जो त्यांनी केन्टसाठी १९०९ मध्ये बनवला होता. सर्वांना वाटू लागले हे दोन भारतीय १० व्या विकेटसाठीचा सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विश्वविक्रम मोडतील. जो ऑस्ट्रेलियन जोडी ऍलन किपॅक्स व हाल हुकर यांच्या नावे (३०७ धावा) होता.

परंतु, फक्त तीन तास दहा मिनिटांची ही भागीदारी शेवटी जॅक पार्करने तोडली. बॅनर्जी १२१ धावांवर बाद झाले तर सरवटे वैयक्तिक १२४ धावांवर नाबाद राहिले. दोघांनी मिळून २४९ धावांची भागीदारी केली. एकवेळ भारताची अवस्था २०५-९ असताना तीच धावसंख्या ४५४-१० झाली होती. ही जोडी जेव्हा मैदानातून बाहेर येत होती, तेव्हा सुज्ञ इंग्लिश प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करत होते.

सरेचा डळमळता आत्मविश्वास –

सरवटे आणि बॅनर्जी यांनी दमविल्याने सरेचे फलंदाज जेव्हा फलंदाजी आले तेव्हा भारतीय गोलंदाज त्यांच्यावर भारी पडले. लेगस्पिनर सीएस नायडू यांनी हॅट्रीक घेत सरेचे कंबरडे मोडले. सरेचा पूर्ण संघ अवघ्या १३५ धावांत सर्वबाद झाला. सरेला फॉलोऑन दिल्यावर त्यांनी आश्वासक सुरवात केली. चंदू सरवटे गोलंदाजीला येई पर्यंत सरेने १७२-१ अशी धावसंख्या उभारली परंतु सरवटेंच्या गोलंदाजीपुढे (५-५४) त्यांची घसरगुंडी उडाली. त्यानंतर मिळालेले २० धावांचे आव्हान एका बळीच्या मोबदल्यात आरामात पार करत एक ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय क्रिकेटमध्ये १० व्या आणि ११ व्या क्रमांकावर शतकी खेळी करणारी एकमेव जोडी म्हणून चंदू सरवटे व शूट बॅनर्जी यांचे कायमचे अजरामर झाले.

असे, विस्मयकारी प्रदर्शन करून देखील दोन्ही खेळाडूंसाठी हा दौरा विसरण्यासारखाच ठरला. सरवटेंना फक्त एक कसोटी सामना खेळायला मिळाला ज्यामध्ये त्यांनी फक्त शून्य व दोन धावा केल्या तर गोलंदाजीमध्ये एकही बळी घेऊ शकले नाहीत. दुसरीकडे, शूट बॅनर्जी यांना त्यापूर्ण दौऱ्यात केवळ बाकावरच बसावे लागले. त्यांनी आपला पहिला व एकमेव कसोटी सामना तीन वर्षानंतर खेळला तर सरवटे सुद्धा नऊ सामन्यांच्यापेक्षा जास्त खेळू शकले नाही. परंतु आजही चंदू सरवटे हे भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेटमधील मानाचे पान आहे. पूर्ण कारकीर्दीत ७४३० धावा व ४९४ विकेट्स त्यांच्या नावावर जमा आहेत. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु इंग्लिश प्रेक्षक चंदू सरवटे व शूट बॅनर्जी यांच्या त्या एतिहासिक भागीदारीविषयी भरभरून आजही बोलतात.

You might also like