येत्या काही दिवसात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सुरू होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडेल. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बुधवारी (८ डिसेंबर) बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यासह आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला. विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. याबाबत माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा टी२० संघाचा कर्णधार म्हणून त्याची शेवटची स्पर्धा ठरली होती. त्यानंतर विराट कोहलीला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर बीसीसीआयने टोकाची भूमिका घेत, विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि ही जबाबदारी आता रोहित शर्माला देण्यात आली आहे.
रवी शास्त्री यांनी रोहित शर्माला कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “रोहित शर्मा नेहमीच संघासाठी जे सर्वोत्तम आहे तेच करतो. संघातील प्रत्येक खेळाडूचा तो पुरेपूर फायदा घेतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे वनडे आणि कसोटी या दोन्ही स्वरूपातील महान खेळाडू आहेत. या संघाकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. ज्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले होते.”
रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून कारकीर्द
अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पद देण्यात आले होते. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघाने २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये जाऊन देखील अप्रतिम कामगिरी केली.
महत्वाच्या बातम्या :
विराट कोहलीने शेअर केला ‘८०च्या दशकातील मुलां’चा फोटो; लिहिले, ‘एकेकाळची गोष्ट आहे…’
हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय