इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा टप्पा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या सामन्याने सुरू झाला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मराठमोळा ऋतुराज गायकवाड. ऋतुराजने झुंजार अर्धशतक झळकावत नाबाद ८८ धावा केल्या. ऋतुराजने या खेळी दरम्यान नऊ चौकार आणि चार षटकार लगावले. त्याने यासाठी ५८ चेंडूंचा सामना केला. त्याच्या खेळीमुळे चेन्नई संघाने १५० धावांचा टप्पा ओलांडत २० षटकांत १५६ धावा केल्या.
या खेळीसोबतच मुंबई विरुद्ध ऋतुराजने चेन्नईकडून सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी हा विक्रम मायकल हसीच्या नावावर होता. त्याने २०१३ मध्ये मुंबई विरुद्ध ८६ धावांची खेळी केली होती. याशिवाय सुरेश रैना ने २०१० मध्ये ८३ धावांची खेळी केली होती.
रविवारी(१९ सप्टेंबर) पुण्याच्या २४ वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जकडून अतिशय बिकट परिस्थितीत खेळतांना संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. त्यांचा सलामीवीर फाफ डू प्लेसीस पहिल्याच षटकात तंबूत परतला. त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात मोईन अलीही शून्यावर बाद झाला. त्याला मिल्नेने सौरभ तिवारी करवी झेलबाद केले. याच षटकात अंबाती रायडू जखमी होऊन माघारी परतला.
चेन्नईचे तीन गडी संघाच्या दोन धावा झाल्या असतांनाच तंबूत परतले होते. पण खेळपट्टीवर एका बाजूने ऋतुराज गायकवाड उभा होता. त्याने सुरुवातीला संयमी खेळी केली, नंतर त्याने रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो सोबत छोटेखानी भागीदारी रचल्या. जडेजाने २६ धावा केल्या, तर ब्रावोने २३ धावा करत ऋतुराजला मोलाची साथ दिली.
किंतु धोनी आणि रैना यांनी पुन्हा निराशा करत खराब प्रदर्शन केले. धोनीने तीन धावा केल्या तर रैनाने चार धावा केल्या. ऋतुराजने ८८ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीमुळे संघाने १५० धावांचा टप्पा ओलांडला. ऋतुराजमुळे चेन्नई संघाने मुंबई संघापुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले आहे.
नंतर १५७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. दरम्यान, एक बाजू सौरभ तिवारीने सांभाळली होती. त्याने नाबाद ५० धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही. त्यामुळे मुंबईचा डाव २० षटकांत ८ बाद १३६ धावांवर संपला आणि चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर दीपक चाहरने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.ट
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्ध सामना जिंकला, पण चेन्नईला मोठा धक्का, रायडू फलंदाजी करताना झाला जखमी, पाहा व्हिडिओ
“गिल आणि राणा भारताची पुढची पिढी, ते कदाचित येत्या दशकात आपली छाप सोडू शकतात”