नवी दिल्ली। चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील सर्वाधिक सातत्याने चांगली कामगिरी करणारा संघ राहिला आहे. परंतु आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामात परिस्थिती बदललेली दिसत आहे. चेन्नई संघात परदेशी खेळाडूंची कमी नाही. परंतु संघाकडून चांगले भारतीय फलंदाजही नाहीत आणि त्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज मुरली विजय पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे, तर दुसरीकडे मधल्या फळीत फलंदाजी करणारा केदार जाधवनेही आतापर्यंत खूप खराब कामगिरी केली आहे.
या हंगामात चेन्नईचे दोन अनुभवी खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर फ्रँचायझीकडून सांगण्यात आले होते की, त्यांच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूंना संघात सामील करण्यात येणार नाही. परंतु चेन्नईच्या मधल्या फळीतील कमकुवत फलंदाजी संघाच्या पराभवाचं कारण बनत आहे. अशात मिड सिझन ट्रान्सफरमार्फत ज्या खेळाडूंना संधी मिळालेली नाही त्या खेळाडूंची आदलाबदल करता येते. चेन्नईकडे अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल आणि विराट सिंग यांसारखे खेळाडू पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.
रहाणेबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. परंतु त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. जर तो चेन्नई संघात आला, तर चेन्नईच्या मधल्या फळीतील समस्या दूर करू शकतो. तसं पाहिलं, तर गरज पडल्यास रहाणे सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारीही सांभाळू शकतो. त्यामुळे चेन्नई संघ रहाणेला संघात घेण्याचा प्रयत्न करू शकतो.
या यादीत दुसरे नाव आहे पार्थिव पटेलचे. तो सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. बेंगलोरने यावर्षी देवदत्त पडिक्कल या नव्या दमाच्या खेळाडूवर विश्वास दाखवत त्याला खेळायची संधी दिली. आणि पडिक्कलही त्या विश्वासाला पात्र ठरत सलामीची जबाबदारी सांभाळत आहे. अशामध्ये पार्थिवला कदाचितच संधी मिळेल. म्हणजेच धोनीच्या चेन्नई संघासाठी पार्थिव पटेल एक पर्याय ठरू शकतो. कारण तो सलामीला फलंदाजी करू शकतो. जर तो चेन्नईमध्ये सामील झाला, तर चेन्नईसाठी सलामीला फलंदाजी करू शकतो आणि फाफ डू प्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
यानंतर विराट सिंगबद्दल बोलायचं झालं, तर त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने घेतले होते. विराटने विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती. परंतु हैदराबाद संघाने त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिलेली नाही. विराटच्या जागी हैदराबादने प्रियम गर्गला संधी दिली आहे. अशामध्ये विराट सिंग चेन्नईसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-याला म्हणतात धमाका! वॉर्नरने दिवाळी आधीच फोडले विक्रमांचे फटाके
-करुन दाखवलं! वॉर्नरने आयपीएलमध्ये जे केलंय ते ना विराट ना रोहितला जमलंय
-‘सिंह म्हातारा झालाय, शिकार करणं विसरला नाही’, धोनीचा कॅच पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ