इंग्लंड क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना संपला असून त्यात इंग्लंडने 267 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यानंतर आता उभय संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (दि. 24 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने इतिहास रचला आहे. तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) संघातील नाणेफेक यजमान संघाने जिंकली. तसेच, गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी इंग्लंडने फलंदाजीला येत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 65 षटकात 3 विकेट्स गमावत 315 धावा कुटल्या. यातील 3 विकेट्सपैकी एक विकेट न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी (Tim Southee) याने घेतली. ही विकेट त्याने इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट (Ben Duckett) याला 7व्या षटकात गोलंदाजी करताना चौथ्या चेंडूवर मिचेल ब्रेसवेल याच्या हातून झेलबाद करून घेतली.
टीम साऊदीचा विक्रम
ही विकेट घेताच साऊदीच्या नावावर जबरदस्त विक्रम नोंदवला गेला. साऊदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेटचा टप्पा पार करणारा गोलंदाज ठरला. तो अशी कामगिरी करणारा जगातील दहावा वेगवान गोलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल वेगवान गोलंदाज इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. त्याने आतापर्यंत 969 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, तो अजूनही क्रिकेट खेळतोय. यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी ग्लेन मॅकग्रा असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 949 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर वसीम अक्रमने 916, शॉन पोलॉकने 829, स्टुअर्ट ब्रॉने 814, वकार युनिसने 789, चमिंडा वासने 761, कर्टनी वॉल्शने 746 आणि ब्रेट लीने 718 विकेट्स घेतल्या आहेत.
#StatChat | Tim Southee joins Daniel Vettori (705) as the only New Zealanders to take 700 International wickets. Southee has represented the BLACKCAPS in 353 matches across the three formats 🏏 #NZvENG pic.twitter.com/sF3joTF1UN
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 23, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज
969 – जेम्स अँडरसन
949 – ग्लेन मॅकग्रा
916 – वसीम अक्रम
829 – शॉन पोलॉक
814 – स्टुअर्ट ब्रॉड
789 – वकार युनिस
761 – चमिंडा वास
746 – कर्टनी वॉल्श
718 – ब्रेट ली
700 – टीम साऊदी*
साऊदीचा असाही विक्रम
टीम साऊदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल गोलंदाज बनला. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये डॅनियल विटोरी दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 696 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या स्थानी रिचर्ड हेडली असून त्यांनी 589 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट चौथ्या स्थानी असून त्याने 578 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ख्रिस केर्न्स हा पाचव्या स्थानी असून त्याने 419 विकेट्स घेतल्या आहेत. (Tim Southee has Most International Wickets for New Zealand)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे न्यूझीलंडचे गोलंदाज
700 – टीम साऊदी*
696 – डॅनियल विटोरी
589 – रिचर्ड हेडली
578 – ट्रेंट बोल्ट
419 – ख्रिस केर्न्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! तिसऱ्या कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ पॅट कमिन्स बाहेर, कोण करणार कॅप्टन्सी?
पराभवाचं दु:ख पचवू शकली नाही हरमनप्रीत, दिग्गज खेळाडूच्या गळ्यात पडून रडली ढसाढसा; तुम्हीही व्हाल भावूक