भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काल(८ जूलै) त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असलेला गांगुली आजही पहिल्यासारखाच लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याला विविध स्तरातून अनेक शुभेच्छा त्याच्या वाढदिवसानिमित्त काल अनेकांनी दिल्या. यादरम्यान त्याच्या घरी ६० ते ७० केकही आले होते, याबद्दल स्वत: गांगुलीनेच खुलासा केला आहे.
गांगुलीने इंडिया टूडेच्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटवर विक्रांत गुप्ताशी बोलताना वाढदिवसाबद्दल सांगितले की ‘केकचा डोंगर आहे आज घरात विक्रांत. माझ्या घरी आत्ता ६०-७० केक आहेत. माहित नाही कोणी पाठवलेत, कोठुन पाठवलेत. त्यामुळे मी काय करतो, माझ्या घराच्या जवळच एक अनाथालय आहे. मी हे सारे केक तिथे पाठवतो.’
‘पण लोकांचे हे प्रेम पाहून खूप छान वाटते. कारण माझ्यामुळे त्यांचा काही फायदा होत नाही. माझ्याशी त्यांचे काहीही घेणे-देणे नसते. मी त्यांच्या आयुष्यावर आता प्रभावही टाकत नाही. असे असूनही आत्ताही मला मिळणारा सन्मान आणि प्रेम पाहून आनंद वाटतो.’
यानंतर विक्रांत यांनी गांगुलीला म्हटले की तू आज ४८ केक तरी कापायला हवेत. त्यावर पुढे गांगुली म्हणाला, ‘४८ हा केवळ एक नंबर आहे.’
याबरोबरच गांगुलीला जेव्हा आयपीएलबद्दल विचारण्यात आले तेव्हा गांगुलीने सांगितले की ‘आत्ता सांगू शकत नाही. पण यासाठी पूर्ण जोर लावू. कारण क्रिकेट न पाहून आता थकलो आहे. विराट कोहलीचे चौकार,रोहित शर्माचे षटकार, एमएस धोनीचे षटकार, रिषभ पंतची फलंदाजी, बुमराहची गोलंदाजी न पाहून आता आपण थकलो आहोत. त्यामुळे क्रिकेट सुरु करण्यासाठी पूर्ण जोर लावू.’
तसेच गांगुलीने असेही सांगितले की तो जरी आत्ता खेळत नसला तरी क्रिकेटची सेवा करण्याची त्याला संधी मिळाल्याने तो आनंदी आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
भूत पाहून सौरव गांगुलीचीही टरकली! फायरब्रिगेडला बोलवलं थेट घरी
काय वेळ आलीय! पाकिस्तान क्रिकेटर्सला टी-शर्टवर आफ्रिदीचे नाव लावून खेळावे लागणार क्रिकेट
शेजारी असावा तर असा! किंग कोहलीला लॉकडाऊनमध्ये डोसा घेऊन आला टीम इंडियातील संघसहकारी