दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पाच साखळी सामन्यांपैकी चार सामने जिंकले, परंतु त्यानंतरही ते २०२१ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांसाठी हे नक्कीच धक्कादायक होते, परंतु हेच तर क्रिकेट आणि हाच तर नेट रनरेटचा खेळ आहे.
या टी-२० विश्वचषकात नेट रनरेटची खूप चर्चा होत आहे. दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा नेट रनरेटच्या क्रूर रूपाला सामोरे जावे लागले. यंदाच्या टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही दक्षिण आफ्रिकेला अंतिम चारमध्ये स्थान मिळवता आले नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचे प्रत्येकी आठ गुण आहेत. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा नेट रनरेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला असल्याने त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
गट १ मध्ये शनिवारी (६ नोव्हेंबर) दोन शानदार सामने झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध इंग्लंड. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत होती. दोन्ही संघांनी ३-३ सामने जिंकले होते आणि उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी त्यांना त्यांचा शेवटचा सामना जिंकणेच नव्हे तर त्यांचा नेट रनरेटही चांगला ठेवायचा होती. नेट रनरेटच्या आधारावर गट-१ मधून उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ ठरणार होता.
दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकले. परंतु, दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या गटात तिसरे स्थान पटकावले. याचे कारण होते नेट रनरेट. यामुळे त्यांचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. भारत गट २ मध्ये आहे. इथेही अशीच परिस्थिती होती. पाकिस्तान या गटातून आधीच पात्र ठरला असून दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात सामना होणार आहे.
मग नेट रनरेट कधी कामी येतो आणि तो कसा मोजला जातो?
गट टप्प्यात जेव्हा संघ गुणांच्या बरोबरीत असतात तेव्हा हा नेट रनरेटचा वापर केला जातो. यावरून स्पर्धेच्या पुढील टप्प्यात कोणता संघ जाणार आणि कोणाचा प्रवास संपणार हे कळते. अनेक वेळा जिंकलेल्या सामन्यांची संख्या हे पाहिले प्रमाण मानले जाते, त्यानंतर नेट रनरेटची संख्या. या विश्वचषकातही हेच चित्र आहे.
तर नेट रन रेट कसा काढायचा
यासाठी एकूण धावा / एकूण टाकलेले षटक यातून एकूण दिलेल्या धावा / एकूण टाकलेले षटक वजा केले जातात.
आता चार सामने खेळल्यानंतर भारताचा नेट रनरेट किती आहे? आणि तो कसा ठरला ते पाहू
भारताने पहिल्या चार सामन्यात केलेल्या धावा पाकिस्तानविरुद्ध- १५१/७ – २० षटके
न्यूझीलंडविरुद्ध – ११०/७ – २० षटके
अफगाणिस्तानविरुद्ध – २१०/२ – २० षटके
स्कॉटलंडविरुद्ध – ८९/२ – ६.३ षटके
भारताने ६६.३ षटकात ५६० धावा केल्या. गणना करण्यासाठी ६६.५ षटके लिहिली जातील.
भारताने केलेल्या एकूण धावा – ५६०/६६.५ = ८.४२
येथे महत्त्वाची बाब म्हणजे, नेट रनरेट मोजताना विकेट्स मोजल्या जात नाहीत. जर संघ त्यांच्या निर्धारित २० षटकांपूर्वी सर्वबाद झाला तर संपूर्ण २० षटके विचारात घेतली जातील किंवा त्यांची खेळलेली षटके मोजली जातील.
भारताविरुद्ध विरोधी संघाने केलेल्या धावा
पाकिस्तान – १५२/० – १७.५ षटके
न्यूझीलंड – १११/२ – १४.३ षटके
अफगाणिस्तान – १४४/७ – २० षटके
स्कॉटलंड – ८५ सर्वबाद – १७.४ षटके
विरोधी संघांनी ७२.२ आणि एकूण ४९२ धावा केल्या. हिशोबासाठी ७२.३३ षटकात मोजल्या जातील.
एकूण धावा – ४९२/७२.३३ = ६.८०२
त्यामुळे भारताचा नेट रन रेट असेल ८.४२१- ६.८०२ म्हणजे १.६१९ (+)