आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये न्यूझीलंडने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गट २ मधील या सर्वात महत्त्वाच्या सामन्यात तीन संघांच्या भवितव्याचा फैसला होणार होता आणि न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकून भारत आणि अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत केवळ १२४ धावा करू शकला. अफगाणिस्तानचे आव्हान न्यूझीलंडने १९ व्या षटकात केवळ २ विकेट गमावून सहज पार केले. या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशीद खान याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
राशीद खानने टी २० मध्ये ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात त्याने मार्टिन गप्टिलला बाद करून या विक्रमाला गवसणी घातली. टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ड्वेन ब्राव्होच्या नावे आहे. त्याने ५५३ विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा सुनील नरीन आहे त्याने ४२५ बळी मिळवले आहेत. तर ४२० गडी बाद करून इम्रान ताहीर तिसऱ्या स्थानी आहे. आता चौथ्या स्थानी राशीद खान विराजमान झाला आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ८ गडी गमावून १२४ धावा केल्या. अफगाणिस्तान संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. नजीबुल्ला झादरानने सर्वाधिक ७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १८.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार केन विलियम्सन ४० धावांवर नाबाद राहिला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने सुपर-१२ मधील ५ पैकी ४ सामने जिंकले. दुसरीकडे, भारतीय संघाने आतापर्यंत ४ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघाने शेवटचा सामना जिंकला तरी न्यूझीलंडची बरोबरी होऊ शकणार नाही.






