दर चार वर्षांनी आयोजित केला जाणारा आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक २०१९ साली इंग्लंड देशात होणार आहे. जगातील क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाला या क्रिकेटच्या महासंग्रामात खेळण्याची इच्छा असते.
प्रत्येक वेळी या विश्वचषकाच्या फॉरमॅट अर्थात ढाच्यात काही ना काही बदल केले गेले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड देशाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या २०१५ सालच्या विश्वचषकात १४ देशांनी सहभाग घेतला होता.
परंतु आर्थिक कारणांमुळे आयसीसीने हि संख्या १४ वरून १० करण्याचं ठरवलं आहे. आणखी एक कारण म्हणजे सहयोगी देशात या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर न मिळणारा प्रतिसाद. सचिन तेंडुलकर, मार्टिन क्रोव आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांनी नाराजी व्यक्त करूनही आयसीसी १० संघांनाच यात प्रवेश देण्याबद्दल ठाम आहे.
१० संघाचं जर या स्पर्धेत भाग घेऊ शकणार असतील तर त्यासाठी पात्रता नक्की काय असावी याची आयसीसीने घोषणा केली आहे.
१. यजमान देश या स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरेल.
इंग्लंड संघ यजमान असल्यामुळे तो या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरला आहे.
२. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत जे देश आयसीसी क्रमवारीत पहिल्या ७ स्थानावर असेल (यजमान देश सोडून) ते आपोआप या स्पर्धेला पात्र ठरतील.
सध्याच्या आयसीसी क्रमवारीनुसार पहिले ५ संघ अर्थात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्युझीलँड हे देश या स्पर्धेसाठी आरामात पात्र ठरतील.
सध्या ६व्या, ७व्या आणि ८व्या स्थानावर असणाऱ्या संघांना अजून बरेच काम करावे लागेल. ज्यात अनुक्रमे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या आशियायी देशांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज सध्या ९व्या स्थानावर असून त्यांचे ७८ गुण असून लंकेचे ८८ गुण आहेत.
वेस्ट इंडिज १ सामना आयर्लंडविरुद्ध तर ५ सामने ४थ्या क्रमांकावरील इंग्लंड संघासोबत खेळणार आहे तर दुसऱ्या बाजूला ८व्या स्थानावरील श्रीलंका भारताबरोबर ५ एकदिवसीय सामने खेळणार असून यात ते विजयच्या दृष्टीने प्रयत्न करतील.
या काळात पाकिस्तान आणि बांगलादेश संघ कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाहीत. जर भारत आणि इंग्लंड अनुक्रमे श्रीलंका आणि विंडीजकडून पराभूत झाले तर मात्र पाकिस्तान आणि बांग्लादेश संघाची गणिते बिघडू शकतात.
३. २०१८ साली या विश्वचषकासाठी पात्रतेची पात्रता फेरी होणार आहे.
याचा कालावधी १ ते ४ एप्रिल २०१८ असणार आहे. आधी या स्पर्धेचं आयोजन बांगलादेश करणार होत परंतु आता ही स्पर्धा इंग्लंड आणि आयर्लंड येथे होणार आहे. यात १० देश सहभागी होणार आहे. यात दोन ग्रुप प्रत्येकात ५ संघ असतील. यात भाग घेणारे संघ तीन वेगेवेगळ्या झोनमधून निवडले जातील.
आयसीसीच्या क्रमवारीत जे संघ शेवटच्या चार स्थानावर आहेत त्यांना पात्रता फेरीमध्ये सरळ प्रवेश दिला जाईल. सद्यस्थितीत अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे देश पात्रता फेरी खेळू शकतात. बाकी संघ ३० सप्टेंबरनंतर घोषित होतील.
टॉप-४ संघ जे आयसीसी वर्ल्ड लीग चॅम्पिअनशिपमधून २०१९ साली होणाऱ्या मुख्य पात्रता फेरीसाठी पात्र ठरतील. नेदरलँड्स, पापुआ न्यू, स्कॉटलंड, हाँग काँग, केनिया, नेपाळ, नामिबिया आणि अरब अमिराती हे संघ सध्या आयसीसी वर्ल्ड लीग चॅम्पिअनशिपमध्ये खेळत आहेत. तसेच आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन-२ मधील अंतिम फेरीत जाणाऱ्या दोन संघाना पात्रता फेरीत खेळता येईल. २०१८ साली होणाऱ्या या स्पर्धेत ओमान आणि कॅनडा या देशांबरोबर ६ संघ सहभागी होतील.