भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जयप्रीत बुमराह सध्या संघातून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याने अनेक महत्वाच्या मालिका खेळल्या नाहीत. असे असले तरी, मागच्या काही दिवसांपासून तो बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस मिळताना दिसला आहे. याठिकाणी त्याने सरावाला सुरुवात केली आणि त्याच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (27 जून) वनडे विश्वचषक 2023चे वेळापत्रक जाहीर होताच बुमराहच्या फिटनेसविषयी ही माहिती समोर आली.
माध्यमांतील वृत्तांनुसार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने एनसीएमध्ये एका सराव सत्रात 7 षटके गोलंदाजी केली. मात्र, दुखापतीतून सावरल्यानंतर तो भारतीय संघात कधी पुनरागमन करणार, याचे उत्तर अद्याप मिळाले नाहीये. पाठीला सतत होणाऱ्या दुखापतीमुळे मार्च 2023मध्ये बुमराहची मोठी शस्त्रक्रिया पार पडली होती. तेव्हापासूनच त्याने फिटनेस पुन्हा मिळवायला सुरुवात केली. या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष असणाऱ्या एका विश्वसनीय सूत्राकडून याविषयी माहिती मिळाली.
सूत्राच्या माहितीनुसार, “अशा प्रकारच्या दुखापतीवर कोणतीच सीमा निश्चित करणे योग्य नाहीये. खेळाडूंवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपण असे म्हणू शकतो की, बुमराह दुखापतीतून चांगल्या पद्धतीने सावरत आहे. त्याने एनसीएच्या नेट्समध्ये सात षटके गोलंदाजी केली आहे. तो आपला कार्यभार सतत वाढवत आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याने हलक्या वर्कआउटपासून गोलंदाजीकडे जाण्याचा प्रयत्न केला.”
“पुढच्या महिन्यात तो काही सराव सामने खेळेल आणि तेव्हा त्याच्या फिटनेसचे निरीक्षण जवळून केले जाईल. त्याच्यासाठी घाई करणे योग्य नाही. एनसीएमध्ये सराव सामना खेळणे एक चांगला निर्णय आहे. कारण यामुळे गरजेनुसार त्याला तयार करता येऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे,” असेही या सुत्राकडून पुढे बोलले गेले.
दरम्यान, बुमराहव्यतिरिक्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हेदेखील एनसीएमध्ये आपल्या दुखापतीवर काम करत आहेत. हे दोन्ही खेळाडू देखील चांगली प्रगती करत आहेत. राहुलने लंडनमध्ये मांडीची, तर श्रेयस अय्यरने पाठीची शस्त्रक्रिया केली आहे. वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून या भारतीय खेळाडूंची फिटनेस संघासाठी महत्वाची ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘भारताविरुद्ध वर्ल्ड कप फायनल खेळताना मजा येईल’, वेळापत्रक मिळताच ऑसी दिग्गजाची प्रतिक्रिया
न थांबता सर्वाधिक कसोटी खेळणारा गोलंदाज! दुसऱ्या Ashes सामन्यात नेथन लायनचा महाविक्रम