आज आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडावर २ कसोटी सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे आता रबाडाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे.
त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला बाद केल्यानंतर त्याच्याबरोबर गैरवर्तन केले होते. त्यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.
रबाडाने काल स्मिथला बाद केले आणि त्याची विकेट साजरी केली होती. त्याचवेळी स्मिथला ‘सेंड ऑफ’ देताना रबाडाने त्याला खांद्याने धक्का दिला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
https://twitter.com/Golfhackno1/status/972089842237607936
https://twitter.com/AlauddinKhilj10/status/972088511703625728
रबाडाच्या अशा वागण्याबद्दल स्मिथने पंचांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाडावर आयसीसीची आचारसंहिता लेव्हल २ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
रबाडाला याआधीच ५ डिमेरिट पॉइंट्स मिळालेले आहेत. तो याआधीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागच्या महिन्यात भारताविरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेतील पाचव्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यावर त्याला कागिसो रबाडाने ‘सेंड ऑफ’ देतात हातवारे करून डिवचले होते. यावेळी त्याला १ डिमेरिट पॉईंट देण्यात आला होता.
काल रबाडाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी चांगली केली. मात्र स्मिथ बरोबरचे गैरवर्तन त्याला भारी पडले. त्याने काल ९६ धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या ५ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका वादांमुळेच जास्त गाजत आहे. या मालिकेत पाहिल्या सामन्यापासून खेळाडूंमधील वाद पाहायला मिळाले आहेत.