बंगळुरू ११ मार्च: बंगळुरू एफसीने सलग १० विजयांची नोंद करत अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली आहे. हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरूच्या संघाने भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजले. त्यात हिरो आयएसएलच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लेग १ सामन्यात बंगळुरू एफसीने मुंबईत जाऊन यजमान मुंबई सिटी एफसीवर विजय मिळवला. आता परतीचा सामना म्हणजेच लेग २ सामना बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना ड्रॉ निकालही पुरेसा आहे. मात्र, त्याचवेळी लीग शिल्ड विजेता मुंबई सिटी एफसी ‘करो वा मरो’च्या कात्रीत सापडला आहे. त्यांना उत्तम गोल सरासरी राखली जाईल असा निकाल नोंदवावा लागणार आहे.
बंगळुरू एफसीने मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई सिटीवर १-० असा विजय मिळवून हिरो आयएसएलमध्ये सलग दहाव्या विजयाची नोंद केली. त्यांनी मुंबई सिटी एफसीवर सलग दुसरा विजय मिळवला होता. ॲलेक्झांडर योव्हानोव्हिच, संदेस झिंगन आणि ब्रुनो रामिरेस यांनी मुंबई सिटीविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम बचाव केला. सुरेश वांगजामने काही महत्त्वपूर्ण टॅकल केले आणि मुंबई सिटीच्या खेळाडूंकडून चेंडू चतुराईने हिसकावला. रोशन नाओरेम याच्या खेळाला तोड नव्हता आणि त्याच्याच पासवर सुनील छेत्रीने विजयी गोल केला होता.
मुख्य प्रशिक्षक सायमन ग्रेसन यांनी मुंबईतील संघाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आणि उद्याच्या सामन्यातही ते त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरण्याची दाट शक्यता आहे. ”त्या सामन्यातील निकालासह आम्ही उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये स्वतःचे आव्हान कायम ठेवले आणि तेच अपेक्षित होते. चांगल्या संघाविरुद्ध आम्ही सध्या फायद्यात आहोत आणि आमच्या गेम प्लानमध्ये बदल होणार नाही. मुंबई सिटीने यंदाच्या पर्वात ५४ गोल्स केले आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. पण, आमचा आत्मविश्वासही काही कमी नाही. आम्ही त्यांच्याविरोधात क्लीन शीट राखली, शिवाय गोलही केला,”असे ग्रेसन म्हणाले.
मुंबई सिटी एफसीची यंदाच्या पर्वातील अपराजित मालिका बंगळुरू एफसीनेच खंडित केली होती आणि त्यानंतर मुंबईला सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली. त्यांनी केवळ एक गोल केला. उपांत्य फेरीच्या पहिल्या लेग मध्ये मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी तगडा संघ मैदानावर उतरवला होता. पम, त्या सामन्यात २० हून अधिक गोल प्रयत्न करूनही मुंबई सिटी एफसीला गोल करता आला नाही. यंदाच्या हंगामात मुंबई सिटी एफसीने प्रतिस्पर्धींवर वर्चस्व गाजवले, परंतु लेग १ मध्ये बिपिन सिंग व लालिआंझुआला छांग्टे यांना प्रभाव पाडता आला नाही. ग्रेग स्टीवर्ट, जॉर्ज परेरा डियाझ आणि अहमद जाहौ यांच्यावर उद्याच्या लढतीत अपेक्षांचे ओझे असणार आहे.
”आमच्या विरोधात गोल होईपर्यंत सामन्यावर आमचीच पकड होती. आम्ही संधी निर्माण केल्या, परंतु त्यावर गोल करण्यात अपयशी ठरलो. आमच्याकडे असे खेळाडू आहेत की ज्यांना या परिस्थितीत काय करायचे, याची जाण आहे. बाद फेरीची हिच मजा आहे की, तुम्हाला आणखी एक संधी मिळते. त्यासाठी आम्ही तयार आहोत,”असे बकिंगहॅम म्हणाले. हिरो आयएसएलमधील एकमेकांविरुद्धच्या १३ सामन्यांत दोन्ही संघांनी प्रत्येकी ६ विजय मिळवले आहेत.
(A ‘do or die’ match for Mumbai City! Bengaluru FC have home ground advantage, a draw is enough for the final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मारिजेन कॅप बनली डब्ल्यूपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारी गोलंदाज, मोडला सहकारी खेळाडूचा विक्रम
विराटबाबत हे काय बोलून गेला ऑसी दिग्गज? म्हणाला,”वर्ल्डकपसाठी तो आयपीएल…”