क्रिकेटविश्वात येत्या ७ फेब्रुवारीपासून आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुरू होणार आहे. यातील पाकिस्तान क्रिकेटने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार केल्याने अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये आता भारतीय दिग्गजांनीही भाग घेतला आहे. महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पाकिस्तानच्या या हालचालीबाबत वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानी खेळाडू निवृत्ती घेतात आणि पुन्हा संघात परतात. त्यांचे असे वागणे सर्वांनाच माहित असून बहिष्कारबाबतही असेच काही होण्याची शक्यता आहे, असे विधान गावसकरांनी केले. त्याबाबत त्यांनी पुढे म्हटले, “पुढील काही दिवसांत जेव्हा जगभरातील आणि त्यांच्या माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया आल्या तर त्यांचा निर्णय बदलू शकतो.”
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच अ गटात आहे. त्यामुळे त्यांच्यात गटातील सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार होता. त्याआधीच पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय संघ या स्पर्धेत खेळेल, मात्र भारताविरुद्ध नाही खेळणार, असा निर्णय घेतला आहे.
बांग्लादेश क्रिकेटनेही सरकारच्या मंजुरीनंतर स्पर्धेतून माघार घेतली होती. तेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही पाकिस्तानही माघार घेणार असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे भारताविरुद्ध बहिष्कार टाकल्याने नक्वींकडे इशारा केला जात आहे.
गावसकर म्हणाले, “पाकिस्तानी खेळाडू निवृत्ती घेतात आणि ती मागेही घेतात असा इतिहास आहे. चाहत्यांच्या म्हणण्यावर ते परत संघात येतात. त्यामुळे १५ फेब्रुवारी आधीही असे काही घडण्याची शक्यता आहे.” तसेच बांग्लादेशच्या जागी या स्पर्धेत स्कॉटलंड खेळणार आहे.
पाकिस्तानी खेळाडू रिटायरमेंट घेत यु टर्न घेण्यामध्ये हुशार आहेत. शाहीद आफ्रिदी, मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम अशी काही त्याची उदाहरणे आहेत.
यावेळी गावसकरांनी पाकिस्तानला आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना) नियम उल्लंघनाबाबतही ताकीद दिली. पाकिस्तानच्या निर्णयानंतर आयसीसीनेही त्यांना अधिक विचार करण्यास सांगितले आहे. तसेच हा निर्णय खेळ आणि चाहत्यांच्या हिताचा नाही, असेही म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे वाईट परिणाम पडू शकतात.





