रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये सामने अधिकच रोमांचक होत चालले आहे, मग ती फलंदाजी असो वा गोलंदाजी. अनेक खेळाडू लक्षवेधी कामगिरी करत आहेत. मुंबई आणि चंदीगड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. या सामन्याचा आज (१२ ऑक्टोबर) दुसरा दिवस असून तुषार देशपांडेने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्याने केलेल्या प्रभावी गोलंदाजीने चंदीगडचा पहिला डाव अवघ्या ७८ धावसंख्येवरच संपुष्टात आला आणि दुसऱ्या डावात एकही धाव झाली नाही, मात्र एक विकेट पडली.
या सामन्यात डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या तुषारने अष्टपैलू खेळी केली.
या सामन्यात चंदीगडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या पहिल्याच डावात ४ खेळाडूंनी अर्धशतके केली. यामध्ये मुशीर खान (६५), कर्णधार सिद्धेश लाड (८६), तनुश कोटियन (५८) आणि मोहित अवस्थी (५६) यांचा समावेश आहे. तसेच उपकर्णधार आयुष म्हात्रेने ४८ आणि तुषारने ४४ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावून ४२९ धावसंख्येचा डोंगर उभारला.
फलंदाजीसाठी आलेल्या चंदीगडला तुषारने एकामागोमाग धक्के दिले. त्याने ११व्या षटकात हॅट्ट्रीकही घेतली. त्याने अर्जुन आझाद (२०), शिवम भांब्री, दिपेंदर कुश यांना बाद केले. त्यामुळे तो रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्ट्रिक घेणारा मुंबईचा केवळ सहावा गोलंदाज ठरला आहे.
चंदीगडच्या पहिल्या डावात तुषारने ७ षटकांत १७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यामधील त्याने एक निर्धाव षटक टाकले. त्याला बाकी गोलंदाजांनीही चांगली साथ दिली. यामुळे चंदीगडला फॉलो-ऑन पडला.
चंदीगडच्या दुसऱ्या डावातही तुषारने त्याची अप्रतिम गोलंदाजी सुरूच ठेवली. त्याने पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. त्यामुळे चंदीगडची दुसऱ्या डावात स्थिती एका षटकांत शून्य धाव आणि एक विकेट अशी झाली.
तुषारने आतापर्यंत ४९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळताना १३४ विकेट्स घेतल्या आहेत. ७० धावांमध्ये ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच त्याने आतापर्यंत ५ वेळा डावात ५ विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी सुरूच राहिली तर तो भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार ठरेल. (Historical hat-trick for Tushar Deshpande in Ranji Trophy 2026-27 Mumbai vs Chandigarh)






