कोची, २८ ऑक्टोबर : हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मधील केरळा ब्लास्टर्स आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील लढत फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी ठरली. निकाल मुंबई सिटी एफसीच्या बाजूने लागला असला तरी केरळा ब्लास्टर्सने आपल्या खेळाने चाहत्यांची मनं जिंकली. केरळाने हा सामना जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद होते, परंतु मुंबई सिटीचा बचाव त्यांना भेदता आला नाही. काही गोल हे पोस्टला लागून अयशस्वी ठरले. मुंबई सिटीने २०१९-२० मध्ये केरळा ब्लास्टर्सच्या घरच्या मैदानावर एकमेव विजय मिळवला होता आणि आज ते येथे जिंकले. मेहताब सिंग (२१ मि.) व जॉर्ज डियाझ ( ३१ मि.) यांच्या गोलने मुंबईला २-० असा विजय मिळवून दिला.
दोन्ही संघांनी सुरुवात आक्रमक केली. दुसऱ्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सचा दिमित्रिओस डिएमांटाकोस चेंडू मुंबई सिटीच्या पेनल्टी क्षेत्रात घेऊन शिरला, परंतु अंतिम टच देण्यात तो चुकला. त्याला मुंबईकडून त्वरित प्रत्युत्तर मिळाले आणि यावेळेल केरळाच्या बचावपटूंनी त्याला रोखले. यजमान केरळाला मुंबईकडून कडवी टक्कर मिळताना दिसत होती आणि कट्टर फुटबॉल चाहत्यांना असाच खेळ अपेक्षित आहे. पहिल्या २० मिनिटांच्या खेळात मुंबईकडून १ ऑन टार्गेट प्रयत्न झाला, केरळाचा गोलरक्षक प्रभसुखन गिलने तो सहज अडवला. बिपिन सिंग व लालिआंझुआला छांग्टे या पाहुण्या संघाच्या खेळाडूंनी केरळाच्या बचावपटूंची कसोटी पाहिली. २१व्या मिनिटाला मुंबईला यश मिळाले. सलग चौथ्या सामन्यात मुंबईने पहिला गोल करण्याचा पराक्रम केला. २१व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेल्या पासवर मेहताब सिंगने लेफ्ट फूटेड बुलेट गोल केला.
मुंबई सिटीच्या या आघाडीनंतर यजमान बिथरले. ३०व्या मिनिटाला छांग्टेने वन ऑन वन संधी सोडली, परंतु पुढच्याच मिनिटाला केरळाच्या बचावपटूंनी मुंबईला सोपी संधी दिली. ग्रेग स्टीवर्टच्या पासवर जॉर्ज डियाझने अगदी सोपा गोल केला. त्याने प्रभसुखनला सहज चकवून मुंबई सिटीची आघाडी २-० अशी भक्कम केली. घरच्या मैदानावर केरळा ५३ पैकी ३९ सामन्यांत अपराजित राहिली आहे. ३३व्या मिनिटाला केरळाचे खेळाडू चेंडू पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेले, परंतु मुंबईचा बचाव तितकाच सक्षम होता. मुंबईने ३७व्या मिनिटाला जबरदस्त काऊंटर अटॅक केला. ग्रेग स्टीवर्टला रोखण्यासाठी प्रभसुखन जागा सोडून पुढे आला अन् मुंबईला तिसरा गोल करण्याची संधी मिळाली. पण, छांग्टे बराचवेळ चेंडूसोबत खेळत राहिला अन् केरळाच्या बचावपटूंना त्याला रोखण्याची संधी मिळाली. ४०व्या मिनिटाला डियाझचा व्हॉलीद्वारे केलेला प्रयत्न फसला. पहिल्या हाफमध्ये मुंबई सिटीचे वर्चस्व पाहायला मिळाले. केरळाकडून ३, तर मुंबईकडून ४ ऑन टार्गेट प्रयत्न झाले.
दुसऱ्या हाफमध्ये मुंबईने दबदबा कायम राखला आणि पहिल्याच मिनिटाला स्टीवर्टने थेट गोलजाळीवर आक्रमण केले आणि प्रभसुखनने तो रोखला. ५२व्या मिनिटाला एड्रियन लुनाच्या क्रॉसवर दिमित्रिओसने हेडरद्वारे सुरेख प्रयत्न केला आणि चेंडू गोलपोस्टच्या अगदी जवळून गेला. केरळाकडून झालेला हा प्रयत्न पाहून प्रेक्षकांचा उत्साह वाढला आणि आपल्या संघाला ते मोठ्या जोशात चिअर करू लागले. ५७व्या मिनिटाला दिमित्रिओसचा एक भन्नाट प्रयत्न मुंबईच्या गोलरक्षकाने रोखला. राहुल केपी, सहाल समद, लुना आणि दिमित्रिओस यांनी मुंबई सिटीच्या पेनल्टी क्षेत्रात सातत्याने आक्रमण सुरू ठेवले आणि चाहत्यांचा उत्साह अधिकाधिक वाढला. सहालचा प्रयत्न मेहताबने हेडरद्वारे ब्लॉक केला, परंतु तो जखमी झाला. ६८व्या मिनिटाला फ्री किकवर मेहताबने हेडरद्वारे दुसरा गोल केलाच होता, परंतु चेंडू पोस्टवरून गेला. इव्हान कलियूझ्नी मैदानावर उतरताच केरळाच्या चाहत्यांचा जल्लोष आणखी वाढला.
७२व्या मिनिटाच्या २० सेकंदात केरळाने ६ यार्ड बॉक्सच्या आत मिळालेल्या दोन संधी गमावल्या. लुनाचा एक प्रयत्न पोस्टवर आदळला, तर राहुल केपीचा दुसरा प्रयत्न पोस्टच्या बाजूने गेला. केरळाकडून राहुल केपीचा खेळ आज बहारदार झाला. केरळाने बऱ्याचदा अखेरच्या टप्प्यांत गोल केले आहेत आणि आजही चाहत्यांना याच चमत्काराची अपेक्षा होती. मुंबईचे आक्रमणही तितकेच जबरदस्त होते आणि अखेरच्या १० मिनिटांत मुंबईने चेंडूवर ताबा राखून केरळावर दडपण निर्माण केले. केरळाला प्रयत्न करूनही यश नाही आले आणि त्यांना ०-२ असा पराभव पत्करावा लागला. ६ मिनिटांच्या भरपाई वेळेतही केरळाला मुंबईचा बचाव भेदता आला नाही.
निकाल : मुंबई सिटी एफसी २ ( मेहताब सिंग २१ मि., जॉर्ज डियाझ ३१ मि. ) विजयी वि. केरळा ब्लास्टर्स ०
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: झिम्बाब्वेविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी, ओक्साबोक्शी रडला पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू
भारतीय यष्टीरक्षक कार्तिककडून मोठी चूक, प्रेक्षकांनी लावल्या ‘धोनी…धोनी’च्या घोषणा