डब्ल्यूडब्ल्यूई आवडत नाही असे क्रीडाप्रेमी शोधून देखील सापडत नाहीत. रिंगच्या आतमध्ये चाललेली फ्रिस्टाईल धुलाई पाहून आबालवृद्ध टाळ्या वाजवत असतात. अत्यंत निर्दयपणे त्यांची मारामारी सुरू असते. आता मारामारी करायची म्हटलं की, शरीर तसेच लागणार. ते खेळाडू देखील असेच असतात. सहा फुटांपेक्षा जास्त उंची, हट्टेकट्टे पोलादी छातीचे. या खेळाडूंना डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये पाहणे काही आश्चर्याचे नसते. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर असा खेळाडू दिसला तर, सर्वांची नजर त्याच्यावरच खिळून राहते. असाच, डब्ल्यूडब्ल्यूई पैलवानासारखा असणारा एक क्रिकेटपटू देखील ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळायचा. आपल्या तगड्या शरीरयष्टी व आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा हा क्रिकेटपटू म्हणजे मॅथ्यू हेडन.
घरी बनवलेल्या प्रॅक्टिस पीचवर करायचा सराव
क्वीन्सलँडमधील किंगारॉय प्रांतात जन्मलेल्या हेडनला देखील इतर ऑस्ट्रेलियन मुलांप्रमाणे लहानपणापासून क्रिकेटची खूप आवड होती. त्याचे कुटुंब बऱ्यापैकी सधन होते. तो सुरुवातीला आपल्या घराच्या परसात भाऊ गॅरीसोबत क्रिकेट खेळायचा. क्लब क्रिकेट खेळू लागल्यावर, त्याच्या सरावात खंड पडू नये म्हणून त्याच्या वडिलांनी फार्म हाऊसच्या अंगणात कृत्रिम खेळपट्टी बसवून घेतली होती. हेडनने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, मेरिस्ट कॉलेज ब्रिस्बेन येथे प्रवेश घेतला. कॉलेजच्या संघाकडून आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सन १९९१ च्या देशांतर्गत हंगामात त्याने क्वीन्सलँडसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केले. पदार्पणातच १४९ धावांची खेळी करून त्याने आपली क्षमता सिद्ध केली.
कसोटी पदार्पणात मोडले बोट
हेडनची पहिल्यांदा राष्ट्रीय संघात निवड १९९३ च्या ऍशेससाठी झाली. मात्र, मायकल स्लेटर याला कर्णधार मार्क टेलर यांच्यासोबत सलामीवीर म्हणून पहिली पसंती दिली गेली. ऍशेसनंतरच्या एकदिवसीय मालिकेद्वारे त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर वर्षभर तो अधेमधे संघात खेळत राहिला. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने आपले कसोटी पदार्पण केले आहे. कसोटीच्या दुसऱ्या डावात ऍलन डोनाल्ड यांचा चेंडू बोटावर लागल्याने, त्याचे बोट मोडले. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. या दुखापतीमुळे, पुढील दोन वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला.
पुनरागमन आणि पुन्हा डच्चू
हेडनने १९९६-१९९७ मध्ये वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकांसाठी संघात पुनरागमन केले. हेडनने वेस्टइंडीज समोर आपले पहिले शतक झळकवले. मात्र, या या दोन्ही संघाविरुद्ध सहा कसोटीत खेळताना तो चार वेळा शून्यावर बाद झाला. दरम्यान त्याची सरासरी अवघी २४ राहिली. या खराब कामगिरीनंतर त्याला पुन्हा संघातून डच्चू देण्यात आला. दुसऱ्या सलामीवीराच्या जागेवर त्यानंतर मॅथ्यू एलिएट, ग्रेग ब्लेवेट तसेच ग्रॅम हिक यांना संधी देण्यात आली. परंतु, यातील कोणीही संघात आपली नियमित पक्की करु शकला नाही.
भारत दौरा गाजवून बनला विक्रमवीर
क्वीन्सलँडसाठी सलग तीन हंगामात सर्वाधिक धावा फटकावल्यानंतर १९९९ च्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याने दुसऱ्यांदा पुनरागमन केले. या दोन्ही दौर्यात त्याची कामगिरी समाधानकारक राहील. हेडनला खरी ओळख मिळाली ती २००१ च्या ऐतिहासिक भारत दौऱ्यावर. संपूर्ण भारत दौर्यावर त्याने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. फक्त तीन कसोटी सामन्यात त्याने १०९ च्या अविश्वसनीय सरासरीने ५४९ धावा चोपल्या. या मालिकेनंतर जगाने नवा हेडन पाहिला. २००१ ते २००५ अशी सलग पाच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये, प्रत्येक वर्षी १,००० पेक्षा अधिक धावा काढण्याचा विक्रम केला.
३८१ धावांची विश्वविक्रमी खेळी आणि २००७ क्रिकेट विश्वचषक
ऑक्टोबर २००३ मध्ये हेडनने पर्थच्या मैदानावर इतिहास रचला. झिम्बाब्वेविरूद्ध ३८१ धावांची खेळी करत त्याने ब्रायन लाराचा ३७५ धावांचा विक्रम मोडला होता. २००४ च्या अखेरीस त्याच्या फॉर्ममध्ये घसरण झाली. सलग सोळा कसोटी सामन्यांत तो शतक मारू शकला नव्हता. २००५ ऍशेसमधील अखेरच्या कसोटीत शतक झळकावत त्याने ही अपयशाची साखळी तोडली. हेडन ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या २००३ आणि २००७ क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाचा नियमित सलामीवीर होता. २००७ विश्वचषक स्पर्धेत हेडनच्या नावे सर्वाधिक धावा होत्या. एकदिवसीय विश्वचषकापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी२० विश्वचषकात देखील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होण्याचा मान हेडनने मिळवला.
वादांची जवळचे नाते
हेडन आपल्या कारकिर्दी दरम्यान अनेकदा वादात देखील अडकला. २००३ ऍशेस दरम्यान त्याने, रागाच्या भरात ड्रेसिंग रूमची खिडकी फोडली होती. २००८ च्या मंकीगेट प्रकरणात देखील त्याची भूमिका महत्त्वाची होती. याच मालिकेत, इशांत शर्मासोबत त्याची बाचाबाची झालेली. भारत देशाबद्दल केलेल्या अयोग्य वक्तव्यामुळे त्याला सर्वांचा रोष ओढवून घ्यावा लागलेला.
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवल्यानंतर, हेडनने आयपीएलमध्ये देखील आपल्या बॅटने धावांचा डोंगर रचला. चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलचे पहिले तीन हंगाम खेळताना हेडनने १,००० पेक्षा अधिक धावा बनवल्या. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात त्याने ५७२ धावा बनवत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली. हेडनने आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात विचित्र प्रकारची ‘मुंगूस बॅट’ वापरून सर्वांना चकीत केले होते.
ब्रॅडमन यांच्यापेक्षा जास्त कसोटी शतके
हेडनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १०३ कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना ८,६२५ धावा बनविल्या. ज्यात ३० शतकांचा समावेश होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावे सहा हजार पेक्षा अधिक धावा जमा आहेत. डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा जास्त शतक बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो.
निवृत्तीनंतर, हेडनने क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी सल्लागार म्हणून काम केले. ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण विभागाचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून त्याला नियुक्त केले गेले आहे. सोबतच, आंतरराष्ट्रीय व आयपीएल सामन्यांदरम्यान तो समालोचन देखील करत असतो.
ऍडम गिलख्रिस्टसोबत मिळून जगभरातील गोलंदाजांच्या उरात धडकी भरवणाऱ्या, ‘हेडॉस’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मॅथ्यू हेडनने जगभरातील क्रिकेटचाहत्यांना आपल्या विस्फोटक खेळाने कायम आनंद दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई सिटी एफसीचा दणदणीत विजय, केरळा ब्लास्टर्सला त्यांच्याच घरी केले पराभूत
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला