भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना कोटांबी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 300 धावा केल्या. यानंतर धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने मोठ्या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि हिटमॅनमध्ये आपल्या फटकेबाजीच्या जोरावर अवघ्या काही चेंडूत सामन्याचा रोख बदलण्याची ताकद आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही त्याने वेगाने सुरुवात केली, पण नंतर तो 26 धावा करत माघारी परतला. तरीही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम रचला आहे.
भारताकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 26 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना तो किवी कर्णधार मायकेल ब्रेसवेलकरवी झेलबाद झाला. या सामन्यात दोन षटकार लगावताच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे 650 षटकार पूर्ण केले आहेत आणि अशी अनोखी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे.





