इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी मालिकेत टिकून राहण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे हा सामना ‘करा किंवा मरा’ प्रकारचा ठरणार आहे. आतापर्यंत झालेले 3 सामने खेळले असले तरी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep yadav) एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. पण चौथ्या कसोटीत कुलदीपला संधी द्यावी, अशी मागणी माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) केली आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी हरभजन सिंगने भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलं की, मी लॉर्ड्स कसोटीपूर्वी आणि बर्मिंघम कसोटीच्याही आधी म्हणालो होतो की कुलदीपला संघात घ्यायला हवं.
कारण इंग्लंडचे फलंदाज मोकळेपणाने फटकेबाजी करतात. पण कुलदीपसारख्या फिरकीपटूला मारणं सोपं नाही. विशेषतः जे गोलंदाज दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवू शकतात, असे ‘मिस्ट्री बॉलर’ असतात. कुलदीप असाच खेळाडू आहे जो निर्णायक क्षणी विकेट घेऊ शकतो. कसोटीत असं नाही की तुम्ही फक्त नवीन चेंडूची वाट बघत बसावं. काही षटकं फक्त काढून द्यायची असं नाही. कुलदीप विकेट मिळवून देण्याची क्षमता ठेवतो.
हरभजनने हेही मान्य केलं की, जर मी भारतीय संघाचा कर्णधार असतो, तर नितीश कुमार रेड्डीला अंतिम संघातून वगळलं असतं आणि कुलदीपला संधी दिली असती. याशिवाय, मी साई सुदर्शनला (Sai surdarshan) मधल्या फळीत पाठिंबा दिला असता. पहिल्या सामन्यानंतर मी त्याला बाजूला केलं नसतं, कारण त्याच्यात खूप क्षमता आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे.
लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत होता. टीम इंडियाला (Team india) विजयासाठी 193 धावांची गरज होती. पण संघ केवळ 170 धावांवरच गारद झाला आणि इंग्लंडने 22 धावांनी सामना जिंकून मालिका 2-1 ने आघाडीवर नेली.






