बांगलादेशची क्रिकेट टीम कसोटी आणि टी20 मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आली आहे. चेन्नईत 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. मात्र या मालिकेपूर्वी मोठं राजकारण पेटलं आहे.
वास्तविक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भारत-बांगलादेश मालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत विचारलं की, बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत असताना भारतीय संघ बांगलादेशच्या संघासोबत क्रिकेट का खेळतोय? आदित्य ठाकरे यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला देखील सवाल केला. गेल्या 2 महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का? असं त्यांनी विचारलं,
आदित्य ठाकरे म्हणाले, “जर बांगलादेशात हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांवर सातत्यानं हिंसा होत असेल, तर बीसीसीआय या मालिकेला परवानगी का देत आहे? भारत सरकारनं याबाबत नरमाईची भूमिका का घेतली आहे? बांगलादेशच्या या दौऱ्याला परवानगी का मिळाली?” आदित्य ठाकरे यांनी थेट बीसीसीआय आणि भारत सरकारवर निशाणा साधला आहे.
बांगलादेशची क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर 2 कसोटी आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळेल. कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला जाईल. तर दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियनवर खेळला जाणार आहे.
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी – 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई, सकाळी 9.30 वा
दुसरी कसोटी – 27 ते 1 ऑक्टोबर, कानपूर, सकाळी 9.30 वा
कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेश संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
बांगलादेश – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, झाकीर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद
हेही वाचा –
IND VS BAN: पावसामुळे सामन्यात येणार बाधा! हवामान अंदाजाने चाहत्यांची चिंता वाढली
बीसीसीआयचं लक्ष आहे का? टीम इंडियात संधीसाठी धडपडणारा चहल या लीगमध्ये करतोय कहर!
विराट कोहलीच्या शब्दांनी आयुष्य बदलले; युवा गोलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य