---Advertisement---

दुर्मिळ योगायोग! टी20मध्ये विंडीजविरुद्ध नेहमीच तळपली क्विंटनची बॅट, पहिल्या शतकाचीही आकडेवारी चकीत…

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 10:31 AM
---Advertisement---

सध्या क्रिकेट विश्वात टी२० मालिकांचे सामने सुरू आहेत. पुरूषांचा टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक संघ टी२०चा अधिक सराव करण्यासाठी सामने खेळत आहेत. त्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोघांमध्ये सध्या टी२० मालिका सुरू असून त्यातील दुसरा सामना गुरूवारी (२९ जानेवारी) खेळला गेला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या धमाकेदार शतकी खेळीमुळे ७ विकेट्सने जिंकला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने २० षटकात ४ विकेट्स गमावत २२१ धावसंख्या उभारली. त्यामध्ये शिमरन हेटमायरच्या ७५ धावा (४२ चेंडू) आणि शेरफेन रुदरफोर्डच्या नाबाद ५७ धावा (२४ चेंडू) यांचा समावेश आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने पहिली विकेट लवकर गमावली. त्यानंतर क्विंटनने रायन रिकल्टनच्या साथीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूत १६२ धावांची भागीदारी केली. यामध्ये क्विंटनने ४३ चेंडूत शतक केले आहे. तो ४९ चेंडूत ११५ धावा करत बाद झाला, तर रिकल्टन ३६ चेंडूत ७७ धावा करत नाबाद राहिला.

या सामन्यात क्विंटनच्या बाबतीत एक दुर्मिळ योगायोग घडून आला आहे. त्याने दुसऱ्यांदा वेस्ट इंडिज विरुद्ध टी२०मध्ये शतकी खेळी करण्याची कामगिरी केली आहे. याआधी त्याने २०२३च्या टी२० सामन्यात ४३ चेंडूतच १०० धावा पूर्ण केल्या होत्या. आताच्याही सामन्यात त्याने ४३ चेंडूतच शतक पूर्ण केले. हे दोन्ही सामने सेंच्युरियनमध्येच खेळले गेले असून दोन्ही सामन्यात त्याने २२० पेक्षा अधिक धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शतके केली आहेत.

क्विंटन डी कॉकची दोन टी२० आंतरराष्ट्रीय शतके-

दोन्ही शतके २२० धावांचा पाठलाग करताना
दोन्ही सेंच्युरियनमध्ये
दोन्ही वेस्ट इंडिजविरुद्ध
दोन्हीसाठी ४३ चेंडू लागले

या मालिकेतील पहिला सामनाही यजमान संघाने जिंकला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या या टी२० मालिकेत दक्षिण आफ्रिका २-० अशी आघाडीवर आहे. दोन्ही संघ टी२० विश्वचषक २०२६मध्ये खेळणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघांचे फलंदाज चांगलेच तयारीत आहेत हे दिसून येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---