माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी 2024 चा आपला सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे. त्यांनी संघात तीन भारतीय आणि एका पाकिस्तानी खेळाडूचा समावेश केला. यासह संघात इंग्लंडच्या तीन खेळाडूंचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, आकाश चोप्रा यांच्या संघात अनुभवी फलंदाज विराट कोहली, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा समावेश नाही. एका खेळाडूला संघात ठेवता न आल्यानं त्यांनी माफी देखील मागितली आहे.
आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, मी यशस्वी जयस्वालचं नाव पहिल्या क्रमांकावर ठेवलं आहे. सलामीवीर म्हणून त्यानं अप्रतिम कामगिरी केली. त्यानं 15 कसोटी सामन्यांच्या 29 डावात 54.74 च्या सरासरीनं 1478 धावा केल्या. त्यानं तीन शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही सलामीवीरानं इतकी चांगली कामगिरी केली नाही. यानंतर त्यांनी इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटचं नाव समाविष्ट केलं. त्यानं 32 डाव खेळले असून 37 च्या सरासरीनं 1149 धावा केल्या आहेत. त्यानं दोन शतकं आणि सहा अर्धशतकं झळकावली.
डकेटनंतर इंग्लंडचा जो रूट आहे, ज्यानं 31 डाव खेळले आणि 55 च्या सरासरीनं सर्वाधिक 1556 धावा केल्या. त्यानं सहा शतकं झळकावली. चोप्रा यांनी न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला चौथ्या क्रमांकावर ठेवलं आहे. त्यानं केवळ 18 डाव खेळले आणि 59 च्या सरासरीनं 1013 धावा जोडल्या. त्यानं चार शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली. इंग्लंडचा धोकादायक खेळाडू हॅरी ब्रूक पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानं 20 डावांत चार शतकं आणि तीन अर्धशतकांच्या मदतीनं 1100 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 55 आहे. त्यानं त्रिशतकही ठोकलंय.
ह संघात कमिंदू मेंडिस हा एकमेव श्रीलंकेचा खेळाडू आहे. त्यानं 16 डावात 74 च्या सरासरीनं 1049 धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. आकाश चोप्रा यांनी सातव्या क्रमांकावर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानला ठेवले. या यादीत तो एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे. त्यानं 13 डावात 44 च्या सरासरीनं एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 539 धावा केल्या. या टीममध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही समावेश आहे, ज्यानं 21 डावात 24 च्या सरासरीनं 48 बळी घेतले.
आकाश चोप्रा यांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कर्णधार बनवलं आहे. त्यानं 2024 मध्ये 18 डावात 24 च्या सरासरीनं 37 बळी घेतले. कमिन्सनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव आहे. त्यानं 26 डावात 14 च्या सरासरीनं सर्वाधिक 71 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हा तिसरा वेगवान गोलंदाज आहे, ज्यानं 16 डावात 34 बळी घेतले. रबाडानं 19 च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडचा गस ऍटकिन्सन, ज्यानं 21 डावात 52 विकेट घेतल्या, त्याला संघात घेऊ न शकल्यामुळे आकाश चोप्रा यांनी हात जोडून माफी मागितली.
आकाश चोप्रांचा 2024 चा सर्वोत्तम कसोटी संघ – यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, जो रूट, केन विल्यमसन, हॅरी ब्रूक, कामिंदू मेंडिस, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स (कर्णधार), जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा
हेही वाचा –
या तीन कारणांमुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार
‘हो.. माझी चूक होती…’, बुमराहसोबत झालेल्या वादाबाबत सॅम कॉन्स्टासचा मोठा खुलासा
संजू सॅमसन शर्यतीतून बाहेर! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रिषभ पंतसोबत कोणाला संधी मिळणार?